बांधकाम ,वीज विभागाने धोकादायक झाडे, फांद्या तोडण्याची गरज..
⚡दोडामार्ग ता.२५-:
अवकाळी पावसाने सलामी दिली आहे.मोसमी आणि पूर्व मोसमी पाऊस काही दिवसांवर आहे.तरीही रस्त्याच्या बाजूला सुकलेली आणि केव्हाही कोसळतील अशा स्थितीतील झाडांकडे सार्वजनिक बांधकाम आणि विद्युत वितरण विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.पावसाळ्यापूर्वी त्यांनी ती झाडे तोडणे आवश्यक असूनही त्यांनी त्याबाबत गांभीर्य दाखवलेले नाही म्हणून वीज ग्राहक आणि वाहनचालक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
अवकाळी आणि पूर्व मोसमी पाऊस सुरू होतो तो वेगवान वारा आणि वादळाच्या साथीनेच! यावेळी जिवंत झाडे उन्मळून तर झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर,वीज वाहिन्यांवर कोसळतात आणि वाहतूक अनेक मार्गावरील वाहतूक बंद होते अनेक गावांचा अनेक दिवस वीज प्रवाह बंद पडतो.इथे तर सुकलेली अनेक झाडे रस्त्याशेजारी आहेत.दोडामार्ग तिलारी मार्गावर विमानतळ बस थांब्याजवळ सुकलेले झाड केव्हाही रस्त्यात कोसळेल अशा स्थितीत आहे. ते कोसळले तर वाहतूक बंद होईलच; पण विद्युत तारा तुटून वीज प्रवाहही खंडित होणार आहे.रस्त्यावरून जाता येता हे झाड सहज दृष्टीस पडत असूनही बांधकाम व विद्युत विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ते तोडण्यासाठी कोणतेच पाऊल उचललेले नाही.खरे तर दुरुस्ती व देखभालीसाठी विद्युत विभागाकडून दर सोमवारी विद्युत पुरवठा खंडित केला जातो.तरीही पावसाळ्याच्या सुरवातीला लोकांना कित्येक तास आणि कित्येक दिवस अंधारात राहावे लागते म्हणून वीज पुरवठा नियमित सुरू राहावा यासाठी आधीच खबरदारी घ्यायला हवी ती घेताना विद्युत विभाग दिसत नाही.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विद्युत विभागाने रस्त्यालगतची सुकलेली झाडे, वीज वाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या फांद्या ,वादळी वाऱ्याने कोसळू शकतील अशी झाडे अवकाळी पाऊस सुरू व्हायच्या आधीच तोडायला हवीत.आताच खबरदारी घेतली तर पावसात होणारे ग्राहकांचे हाल तरी कमी होतील.
- लॉरेन्स डिसोझा,वीज ग्राहक, मुळस