खा. विनायक राऊत ः खारेपाटण येथे काॅर्नर सभा..
कणकवली ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रोखण्याची क्षमता कोणच्यात झाली. त्यामुळे त्यांना रोखण्याची भाषा कोणीही करू नये, असा इशारा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार विनायक राऊत यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता दिला. मोदी-शहांवर राऊतांनी हल्लाबोल केला.
महाविकास अाघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ खारेपाटण येथील शिवसेनेच्या कार्यालयाजवळ काॅर्नर सभा आयोजित केले होती. याप्रसंगी श्री. राऊत बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या संजना घाडी, गौरीशंकर खोत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख नीलम पालव, अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी रज्जाक रमदुल, सामाजिक कार्यकर्ते संदीप कदम, माजी जि. प. सदस्य नागेश मोरये, महिला आघाडीच्या तालुका संघटक वैदेही गुडेकर, तालुकाप्रमुख कन्हैया पारकर, सचिन सावंत, अंजली पांचाळ, उपतालुकाप्रमुख महेश उर्फ गोट्या कोळसुलकर,दया कुडतकर, तेजस राऊत आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, देशातील मोदी सरकारने लोकशाहीचे स्वातंत्र्य धोक्यात आणले आहे. हे सरकार पुन्हा सत्तेत अाल्यास देशात लोकशाही राहणार नाही, तर हुकूमशाही येणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा दारूण पराभव करून त्यांना घरचा रस्ता दाखवावा, असे अावाहन त्यांनी केले. नारायण राणे व त्यांच्या दोन मुलांनी राजकीय स्वार्थासाठी जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवले, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राणेंचा पराभव करून त्यांना धडा शिकवावा, असे आवाहन त्यांनी केले.
भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी आहे, अशी जोरदार टीका संजना घाडी यांनी केली. यावेळी सेनेच्या नेत्यांनी राणे पित्रा-पुत्रांवर हल्लाबोल केला. महेश भोगले यांची तळेरे शाखाप्रमुखपदी तर तळेरे शहरप्रमुखपदी आदित्य महाडिक यांची निवड करण्यात आली. या सभेला मविआचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.