मत्स्य अधिकारी दबावाखाली काम करतात…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत मालवणातील पारंपरिक मश्चिमार आंदोलनाला दिली आज भेट

*💫मालवण दि.२२-:* गेले दहा दिवस उपोषण आंदोलन करणाऱ्या पारंपारिक मच्छीमारांच्या मागण्या शासनाने मान्य करून त्यांना न्याय दिलाच पाहिजे. कायद्याने बंदी कालावधी असूनही मासेमारी करणाऱ्या पर्ससीन नौकांवर कारवाई मत्स्य अधिकारी का करत नाहीत, मासेमारी केंद्राच्या हद्दीत होत असल्याने कारवाई करू शकत नाही असे स्थानिक मत्स्य अधिकारी म्हणतात, मात्र तेच म्हणणे मत्स्य आयुक्त लेखी देत नाहीत. या सर्व प्रकारात मत्स्य अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. मच्छीमारांच्या हिताचा विचार न करता मत्स्य अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली वावरत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत करत केंद्राच्या सागरी हद्दीत राज्य मत्स्य विभाग कारवाई करू शकत नसेल तर कारवाई करण्याची केंद्र सरकारचीही तेवढीच जबाबदारी असून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामंत यांनी केली आहे. बंदी कालावधी असूनही मासेमारी करणाऱ्या एलईडी पर्ससीन नौकांवर मत्स्य विभाग कारवाई करत नसल्याच्या विरोधात मालवणात साखळी उपोषण करणाऱ्या पारंपारिक मच्छीमारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यानंतर मालवण येथील कान्हा हॉटेल मध्ये राष्ट्र पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह काका कुडाळकर, व्हिक्टर डान्टस, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, बाबू डायस, आगोस्तीन डिसोझा आदी व इतर उपस्थित होते. यावेळी अमित सामंत म्हणाले, पर्ससीन बंदी कालावधी असताना राज्य असो किंवा केंद्र या दोन्ही हद्दीत पर्ससीन एलईडी मासेमारी होत असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई साठी पारंपारिक मच्छीमारांनी छेडलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. नियम तोडून मासेमारी होत असताना मत्स्य अधिकारी हे निर्लज्जपणे दुर्लक्ष करत आहेत. बंदी कालावधीत केंद्र शासनाच्या सागरी हद्दीत पर्ससीन मासेमारी होत असेल तर केंद्र शासनाचीही कारवाई करण्याची जबाबदारी आहे. केंद्र शासनाने अशा पर्ससीन बोटींचा शोध घेऊन कारवाई केली पाहिजे. त्यासाठी गस्ती नौकांची संख्या वाढवली पाहिजे असेही अमित सामंत म्हणाले. पर्ससीन वर बंदी आणण्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीच भूमिका त्यावेळी महत्वाची होती. बंदी असताना आता कारवाईत कोणते अडथळे आले आहेत. पर्ससीन नौकांवर ३० ते ३५ खलाशी कार्यरत असतात. यातून कोरोना नियमांचा भंग होत आहे. त्यावर मत्स्य व्यवसाय पोलिसात तक्रार देऊन गुन्हे दाखल का करत नाही. पोलिसांचे सहकार्य मिळत नाही असे मत्स्य अधिकारी सांगतात. याबाबत आम्ही गृहमंत्र्यांचे लक्ष वेधून पोलिसांना कारवाई करायला लावू. तसेच कोरोना नियंत्रणात आल्यावर राष्ट्रवादीचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा मालवणात दौरा आयोजित करू असेही सामंत म्हणाले. गस्ती नौका नसल्याचेही मत्स्य अधिकारी सांगतात, मत्स्य विभागाने गस्ती नौकेसाठी आवश्यक प्रस्ताव आमच्याकडे द्यावे आम्ही अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून गस्तीनौकेसाठी निधी मिळवून देऊ. महाविकास आघाडी सरकार मधील सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीत पर्ससीन मासेमारीच्या बाजूने आहेत असा आरोप विरोधक करतात, मात्र आरोप करणे हे विरोधी पक्षांचे कामच असते. १२ नॉटिकल सागरी क्षेत्राच्या बाहेर केंद्र शासनाचीच हद्द असल्याने केंद्र शासनानेच पर्ससीन मच्छीमारीवर कारवाई करावी. यासाठी राज्यातील विरोधी पक्षनेते व केंद्रातील मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा असेही अमित सामंत म्हणाले.

You cannot copy content of this page