*💫मालवण दि.२५-:* छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण समुद्रात उभारलेल्या किल्ले सिंधुदुर्गचा पायाभरणी सोहळा ज्या ठिकाणी संपन्न झाला त्या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दांडी येथील मोरयाचा धोंडा या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन आज किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्यावतीने साजरा करण्यात आला. या पाषाणाचे पूजन करून हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत शिवरायांना मानवंदना देण्यात आली. हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या समुद्रात किल्ले सिंधुदुर्गची उभारणी करण्यापूर्वी २५ नोव्हेंबर १६६४ रोजी मालवण दांडी भागातील समुद्रकिनाऱ्यावरील मोरयाचा धोंडा येथे सिंधुदुर्ग किल्ल्याचे भूमीपूजन केले. दरवर्षी २५ नोव्हेंबर रोजी प्रेरणोत्सव समितीमार्फत या पवित्र पाषाणाचा वर्धापन दिन मोरया दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या महाराजांच्या या पवित्र स्मृतीस मानाचा मुजरा करण्यासाठी आज सकाळी आठ वाजता मोरयाचा धोंडा येथे वायरी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ श्री. मालवणकर यांच्या हस्ते मोरेश्वराचे पुजन करण्यात आले. तर शिवरायांचा जयघोष करीत इतिहासातील आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी किल्ले प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, उपाध्यक्ष दत्तात्रय नेरकर, सदस्य भाऊ सामंत, प्रदिप वेंगुर्लेकर, रवी तळाशिलकर, रसिका तळाशीलकर, जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, नगरसेविका तृप्ती मयेकर, उद्योजक संजय गावडे, भाऊ साळसकर, रत्नाकर कोळंबकर यांच्यासह शिवप्रेमी, ग्रामस्थ उपस्थित होते.
ऐतिहासिक मोरयाचा धोंडा स्थळाचा वर्धापन दिन साजरा…..
