महिनाभरात वीस ते पंचवीस अपघात : प्रशासन जबाबदार, ग्रामस्थांचा आरोप..
⚡बांदा ता.२३-: मडुरा शेर्ले मार्गावर एप्रिल 2023 पासून खडीकरणाचे काम सुरू आहे. केलेले खडीकरण वारंवार उखडले जात असल्याने रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. रिक्षाच गरोदर महिलांची प्रसुतीगृह बनत असल्याचे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे. कामाबाबत शहरात एक व ग्रामीण भागात दुसरा नियम असल्याचे दिसून येत आहे. येत्या तीन दिवसात रस्त्यावर कार्पेटचे काम सुरू न झाल्यास सोमवारी 26 फेब्रुवारी रोजी मडुरा पंचक्रोशीतील रिक्षा बंद करून सार्वजनिक बांधकाम विभागावर धरणे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा रिक्षा चालकांसह मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
गुरुवारी सकाळी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी रस्त्याची पाहणी केली. यावेळी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, भारतीय सुराज्य संस्था अध्यक्ष दिनेश नाईक, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, मडुरा माजी उपसरपंच विजय वालावलकर, रिक्षा चालक पेद्रु डिसोझा, प्रवीण नाईक, विद्याधर नाईक, ग्रामस्थ सागर गोठस्कर, सुनील मडुरकर, श्री. मयेकर आदी उपस्थित होते.
मडुरा शेर्ले रस्त्यावर महिनाभरात वीस ते पंचवीस अपघात घडले. परदेशी पर्यटकांनी तर रस्ता ‘व्हेरी बॅड रोड’ असा दाखलाच दिला आहे. खडीकरणकरून एवढे दिवस कार्पेटसाठी का लागतात. शहरात खडीकरण केलेल्या रस्त्यावर आठ दिवसात कार्पेट टाकले जाते मात्र ग्रामीण भागात याकडे पूर्णपणे सोयीस्कर दुर्लक्ष केला जातो. अशा कामांना सरकारच पाठीशी घालत असल्याचा आरोप उपस्थित ग्रामस्थांनी केला.
रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्याचा कालावधी काय आहे. खडीकरणावर कार्पेट करण्यासाठी एवढा उशीर का होत आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
रिक्षाच बनते प्रसूतीगृह
आठ दिवसांपूर्वी एका गरोदर महिलेला रिक्षातून हॉस्पिटलपर्यंत नेताना तारेवरची कसरत करावी लागली. उखडलेले खडीकरण अन प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा रुग्णांना असह्य वेदना सहन कराव्या लागतात. त्या दिवशी तर गरोदर महिलेची प्रसूती रिक्षातच होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती असे रिक्षाचालक विजय वालावलकर यांनी सांगितले.
