विजय चौकेकर: भोंडू बाबांपासून सावध राहून समाजाचा संरक्षण करा..
⚡मालवण ता.०८-: महात्मा गांधींजींनी आपल्या जीवनात अहिंसेचा मार्ग स्विकारला. तसेच त्यांचे वर्तन सत्याचे आचरण करणारेच होते आणि सत्य हे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेऊन आचरण केल्यानेच प्राप्त होते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी केले.
मसुरे येथील आर. पी. बागवे हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज येथे महात्मा गांधींच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘अंधश्रद्धा सोडा विज्ञानाची कास धरा’ या व्याख्यान कार्यक्रमात विजय चौकेकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या मुखाध्यापिका अर्चना कोदे, स्कूल कमिटी सदस्य विठ्ठल लाखम उपस्थित होते.
यावेळी विजय चौकेकर यांनी शासनाने मंजूर केलेल्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या बारा कलमांची प्रात्यक्षिकांसह मुलांना माहिती दिली. काही प्रात्यक्षिके मुलांकडून करून घेतली. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक समजून घेऊन समाजात असलेल्या विविध अंधश्रद्धा माणसाचे कसे नुकसान करतात आणि याचा फायदा जादूटोणा करणारे भोंदूबाबा कसा उठवितात आणि आपले शारीरिक , मानसिक, आर्थिक आणि लैगिक शोषण कसे करतात हे चौकेकर यांनी उदाहरणाद्वारे समजावून दिले. भोंदू बाबांपासून सावध राहून स्वतःचे आणि समाजाचे रक्षण करा तसेच असे भोंदूबाबा समाजात आढळल्यास तात्काळ दक्षता अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन चौकेकर यांनी केले.
यावेळी इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. यावेळी प्रशालेचे शिक्षक श्री. पाताडे, भरत ठाकूत, शिक्षिका तळाशिलकर, भोगले, जाधव आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
