राहुल नार्वेकरांच्या घटनाबाह्य निकालातून लोकशाहीची पायमल्ली…

हरी खोबरेकर:मालवणात ठाकरे शिवसेनेकडून राहुल नार्वेकर यांचा निषेध..

⚡मालवण ता.११-:
मुर्दाबाद… मुर्दाबाद…राहुल नार्वेकर मुर्दाबाद, घटनेची पायमल्ली करणाऱ्या राहुल नार्वेकर यांचा निषेध असो… शिवसेना आमच्या सायबांची…नाही कोणाच्या बापाची !…हमारा नेता कैसा हो… उद्धव ठाकरे जैसा हो अशा घोषणा देत आज मालवणात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यानी दिलेल्या निकालावर संताप व्यक्त करत त्यांचा निषेध व्यक्त केला. घटनाबाह्य पद्धतीने विभानसभा अध्यक्ष बनलेल्या राहुल नार्वेकर यांनी पदाचा गैरवापर करून घटनाबाह्य असाच निकाल देत लोकशाहीची पायमल्ली केली आहे, अशी टिका ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्यावर आज मालवणात ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवत राहुल नार्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांचा निषेध नोंदवला. यावेळी शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी नार्वेकर यांच्यावर टीका केली. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक नितीन वाळके, यतीन खोत, गणेश कुडाळकर, दिपा शिंदे, रश्मी परुळेकर, निनाक्षी शिंदे, सन्मेश परब, उमेश मांजरेकर, यशवंत गावकर, विरेश नाईक, चिंतामणी मयेकर, सिद्धार्थ जाधव, उमेश प्रभु, शिशुपाल राणे, राजू मेस्त्री, प्रसाद चव्हाण, चंदू खोबरेकर, नरेश हुले, सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, तेजस लुडबे, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर, सचिन गिरकर, राहुल परब, बॉनी काळसेकर, मयूर करंगुटकर, काली परब आदी उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, राहुल नार्वेकर यांना घटनाबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्षपदी बसविण्यात आले. म्हणूनच अध्यक्षपदा बद्दल रिटर्न गिफ्ट म्हणून राज्य सरकार, भाजप तसेच नरेंद्र मोदी व अमित शहा यांना खुश करण्यासाठी नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. शिंदे गटातील गद्दार भाजपला पाठिंबा देत असल्याने त्यांना अभय देण्याचे काम नार्वेकर यांनी केले आहे, असेही खोबरेकर म्हणाले.

शिवसेनेचे पक्षप्रमुख व सचिव अधिकृत नाहीत असे म्हटले गेले, शिवसेनेची निवडणूक प्रक्रिया अनधिकृत ठरवली गेली, असे असताना याच पक्षाने उमेदवारीसाठी दिलेले एबी फॉर्म कसे अधिकृत ठरविले गेले, ते फॉर्म त्याचवेळी का डावलले गेले नाही ? असा सवाल हरी खोबरेकर यांनी उपस्थित केला. शिवसेना कोणाची हे शत्रू राष्ट्र पाकिस्तानही सांगेल. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेली पक्षाची घटना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान चुकीचे ठरविण्याचे काम नार्वेकर यांनी आपल्या निर्णयातून केले आहे. नार्वेकर यांनी गद्दार सरकारला अभय दिले असले तरी जनता आपल्या मनात गद्दारांना स्थान देऊ शकत नाही, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

यावेळी नितीन वाळके म्हणाले, इतिहास काळापासून महाराष्ट्राला फंद फितुरीचा शाप लागला असून मागील दहा वर्षांपासून पुन्हा महाराष्ट्रात हा शाप अधोरेखित झाला आहे. दिल्लीतील सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राला नेहमीच आकस बुद्धीने पाहिले गेले आहे, पूर्वी औरंगजेबाचा काळ होता, आज नरेंद्र मोदींचा काळ आहे. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे षडयंत्र नेहमीच करण्यात आले आहे. राहुल नार्वेकर यांनी दिल्लीहून आलेले इंग्रजी निकाल पत्र केवळ वाचण्याचे काम केले, शेवटचे आभाराचे शब्द फक्त त्यांचे होते. नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयला घटनेचा कोणताही आधार नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासमवेत ठाम उभे असून येत्या निवडणुकीत जनताच योग्य तो निकाल लावून सोक्षमोक्ष लावेल, असेही नितीन वाळके म्हणाले.

You cannot copy content of this page