⚡मालवण ता.०८-: अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर (शाळा पेंढऱ्याचीवाडी वेंगुर्ले) यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर हडप व प्रमुख अतिथींच्या हस्ते देवयानी आजगावकर यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व रोख पाच हजार रुपये असा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
आचरे येथील न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या जी. टी. गावकर शिक्षण नगरी सभागृहात संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चंद्रशेखर हडप तसेच व्यासपीठावर दत्तात्रय हिर्लेकर, सदानंद कांबळी, सुगंधा गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गौरी पटनाईक, कथामाला मालवण अध्यक्ष सुरेश ठाकूर, सुरेश गावकर, मोहन गावकर, नवनाथ भोळे, तातू कुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी प्रास्ताविकात सुरेश ठाकूर यांनी सेवामयी शिक्षक पुरस्कार व कथामाला मालवणच्या विविध कार्याचा आढावा घेतला. सदानंद कांबळी यांनी सदर पुरस्कार निवडीची प्रक्रिया कथन केली. सुरेश गावकर यांनी कै. जी. टी. गावकर यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना चंद्रशेखर हडप यांनी कथामाला पुरस्कार मिळणे ही शिक्षकाची खरी कमाई आहे. कथामालेने गौरविलेल्या सर्व शिक्षकांचे कार्य हे आदर्श व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित असेच आहे, असे सांगितले. सत्काराला उत्तर देताना सौ. देवयानी आजगावकर म्हणाल्या, शैक्षणिक कारकिर्दीमध्ये समाज व पालकांचे उत्तम सहकार्य लाभले आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून विद्यार्थ्यांच्या विकासाचा विचार करून कार्य करत राहिले. त्यातूनच चांगले विद्यार्थी व चांगले काम घडल्याचे समाधान मिळाले. कथामालेने दिलेल्या पुरस्कारामुळे केलेल्या कामाची पोचपावती मिळाली, असेही त्या म्हणाल्या.
विद्यार्थ्यांच्या वतीने वजराटच्या सरपंच अनन्या पुराणिक व साईशा पाटील, शिक्षक मुकुंद काळोजी, ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, बाबाजी भिसळे, लक्ष्मणराव आचरेकर, प्रकाश पेडणेकर, मनाली फाटक, कोमसाप मालवणच्या वतीने अनिरुद्ध आचरेकर व सदस्य तसेच कणकवली येथील शिक्षकांच्या वतीने रश्मी आंगणे कल्पना मलये, हिर्लेकर गुरुजी, चंद्रहास हिर्लेकर यांनी देवयानी आजगावकर यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला परशुराम गुरव, गुरुनाथ ताम्हणकर, विजय चौकेकर, चंद्रकांत माने, कल्पना मलये, रश्मी आंगणे, श्रुती गोगटे, रामचंद्र वालावलकर, अनघा कदम, शिवराज सावंत, चंद्रशेखर धानजी, संजय परब, अमृता मांजरेकर, तेजल ताम्हणकर, सायली परब, विनोद कदम, भावना मुणगेकर, मधुरा माणगावकर, उज्वला धानजी कथामाला मालवणचे कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन पांडुरंग कोचरेकर यांनी केले तर विजय चौकेकर यांनी आभार मानले.
