Headlines

सकारात्मक दृष्टीने लिखाण केल्यास विकास होवू शकतो…

पत्रकार दिन कार्यक्रमात पालकमंत्री चव्हाण यांचे आवाहन:बाळशास्त्री जांभेकर भवनात जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण

ओरोस ता.०६-: टीका आणि टीकेला उत्तर एवढे मर्यादित न राहता पत्रकारांनी हात आणि हाताला काम मिळण्यासाठी लिखाण केले पाहिजे. जिल्ह्यातील ३६ किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन घेवून लिखाण केल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही. पत्रकारांनी एकाद दुसरा विषय निवडून त्याचा परिपूर्ण अभ्यास केला पाहिजे. त्या विषयाची स्पेशालिटी तुमच्याकडे असली पाहिजे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक तथा जिल्ह्याचे बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आयोजित पत्रकार दिन कार्यक्रमात बोलताना केले.
मराठी पत्रकार दिनानिमित्त मराठी पत्रकार सृष्टीचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गनगरी येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवन सभागृहात जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री चव्हाण यांच्यासह शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रमुख वक्ते तथा जेष्ठ पत्रकार वसंत भोसले, आ वैभव नाईक, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, संघ सचिव देवयानी वरसकर, तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चीलवंत, माधव कदम, गणेश जेठे, संतोष वायंगणकर, नंदकिशोर महाजन, बाळ खडपकर, विद्याधर केनवडेकर, रमेश जोगळे, महेश सरनाईक, संतोष राऊळ, संतोष सावंत, महेश रावराणे, दाजी नाईक, संदीप देसाई, लखु खरवत, महेश रावराणे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना मंत्री चव्हाण यांनी, बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘इंग्रजांचे काम कसे चुकीचे आहे, हे मांडण्याचे काम केले. हिंदू म्हणून बाळशास्त्री यांनी त्याकाळात महत्वाची भूमिका घेतली होती. पत्रकारिता दर्पण प्रमाणे पारदर्शक पाहिजे, यांचा आदर्श त्यांनी घातला होता. पुरस्कार हा कार्यक्रम नसतो. तर ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात चांगले काम करण्याची जाणीव करून देण्यासाठी तो दिला जातो. चुकीच्या घडत असलेल्या घटना नागरिकांसमोर आणण्याचे काम पत्रकारांनी केले पाहिजे. टीआरपी च्या खेळात न अडकता आपली जबाबदारी समजून काम केले पाहिजे. देश महासत्ता बनण्याकडे जात असताना तरुणांनी काय केले पाहिजे, यांचे प्रबोधन झाले पाहिजे, असे आवाहन केले.

चौकट
यावेळी बोलताना शिक्षणमंत्री केसरकर यांनी, बाळशास्त्री जांभेकर यांचे भवन उभारण्याचे स्वप्न साकार झाले आहे. हे भवन म्हणजे बाळशास्त्री यांना खरी श्रद्धांजली आहे. त्यांचा जन्मगाव असलेल्या पोंभूर्ले गावाला पुस्तकांचे गाव म्हणून दर्जा मिळाला आहे. जिल्ह्यातील पत्रकारिता वेगळ्या उंचीची पत्रकारिता आहे. शासन योजनेत पत्रकारांचे सहकार्य महत्त्वाचे आहे. समाजाचा आरसा पत्रकार असतो. या जिल्हा एवढे विकासाचे मार्ग अन्य जिल्ह्यांत नाहीत. पत्रकार भवनसाठी आवश्यक निधी संकलनासाठी लागणारे सर्व योगदान १०० टक्के देईन, असे यावेळी बोलताना सांगितले. आ नाईक यांनी ‘बाळशास्त्री जिल्ह्याचे सुपुत्र असल्याचा अभिमान आहे. त्यांचा वारसा जपणाऱ्या जिल्ह्यातील पत्रकारांनी आपली पत्रकारीता स्वस्त होवू देवू नये. पत्रकारांनी आपला दर्जा कमी करून घेवू नये, असे आवाहन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भोसले यांनी, युती आणि आघाडीचे राजकारण सुरू झाल्यावर राज्याची घसरण सुरू झाली आहे, असे ठाम मत व्यक्त केले.

पुरस्कारांचे वितरण
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार समितीचा २०२३ चा ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार कणकवली येथील चंद्रशेखर तांबट, ग्रामीण पत्रकार पुरस्कार मालवण मसुरे येथील दत्तप्रसाद पेडणेकर, युवा पत्रकार पुरस्कार वैभववाडी येथील श्रीधर साळुंखे यांना तर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सिंधुदुर्गनगरी येथील दैनिक सकाळचे प्रतिनिधी नंदकुमार आयरे, दोडामार्ग गणपत डांगी, सावंतवाडी अवधूत पोईपकर, कुडाळ प्रमोद म्हाडगुत, वेंगुर्ला प्रथमेश गुरव, देवगड दयानंद मांगले यांना पुरस्कार देवून मंत्री रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर, आ नाईक यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधव कदम यांचा विशेष सत्कार पालकमंत्री चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. सुत्रसंचलन शुभम धुरी यांनी केले. आ नाईक यांच्याहस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

You cannot copy content of this page