लघुपाटबंधारे विभागाची कुडाळ नगरपंचायतीला आश्वासन..
⚡कुडाळ ता.२१-:
कुडाळ शहराजवळून वाहणाऱ्या भंगसाळ नदीवर बंधारा घालून मोठ्या प्रमाणात पाणी अडविण्यात आले आहे. या पाण्याचा वापर प्रामुख्याने उन्हाळी शेतीसाठी तसेच विहिरींची पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी होतो.
या बंधाऱ्यामुळे कुडाळ शहर तसेच एमआयडीसी भागात उन्हाळ्यातही मुबलक पाणी पुरवठा होतो. मात्र, भंगसाळ नदीवरील या बंधाऱ्यात पावसाळ्यात वाहून येणारी मोठी झाडे, ओंडके अडकून पडले आहेत. तर बंधाऱ्याच्या दुसऱ्या बाजूसही मोठ्या प्रमाणात कचरा, लाकडे अडकली आहेत. त्यामुळे नदीचा परिसर आणि पाणी सुद्धा अस्वच्छ बनून दुर्गंधी येत आहे. याबाबत कुडाळ नगरपंचायतने लघुपाटबंधारे विभागाला माहिती दिली. त्यानुसार, कोकण लघु पाटबंधारे विभाग अधिकारी मांगले, नगराध्यक्ष अक्षता खटावकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, मुख्याधिकारी नातू यांनी बंधाऱ्याच्या ठिकाणी भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कुडाळ नगरपंचायतीने लघु पाटबंधारे विभागाकडे नदीतील कचरा, अडकलेली लाकडे तत्काळ काढून टाकण्याची मागणी केली. यावर लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी नदीतील कचरा तसेच ओंडके आणि कचरा पुढील आठ दिवसात काढून टाकण्यात येतील आणि पाण्याचा प्रवाह योग्यरितीने सुरू होईल, असे आश्वासन दिले.
