६ लाख ७२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त:राज्य उत्पादन शुल्क, इन्सुली, पथकाची कारवाई..
⚡बांदा ता.२०-: राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने जुना पत्रादेवी -बांदा मार्गावर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करताना चारचाकी वाहनासह ६ लाख ७२ हजार ८०० रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत माहिती अशी की,
मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार आज सकाळी 04.30 च्या सुमारास विजय सुर्यवंशी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, विजय चिंचाळकर विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर वैभव वैद्य साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळेश्वर गणपती मंदिराजवळ, जुना पत्रादेवी-बांदा मार्गावर सापळा रचून संशयीत वाहनांची तपासणी करीत असताना बातमीप्रमाणे वर्णन असणारी सफेद रंगाची मारुती सुजूकी वाहनाची तपासणी केली असता वाहनाच्या मागील सीटवर ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे 20 बॉक्स अवैध साठा मिळून आला. यात आरोपी शंकर महादेव मंडले, (वय 40 वर्षे, रा. कार्वे, ता. कराड, जि. सातारा) यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.यात एकूण रु.६,७२,८०० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला. सदर कारवाई मा.श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, श्री.तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक, श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. दिपक वायदंडे, जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली. सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली प्रदीप दीप रास्कर हे करीत आहेत.
