परशुराम उपरकर:पुतळ्याकडील टाईल्स सरकल्याचे फोटो व्हायरल; सर्व बोगसगिरी बाबत लवकरच आंदोलन..
⚡मालवण ता.१४-: नौदल दिनानिमित्त मालवणात करण्यात आलेली विकासकामे अत्यंत घाईगडबडीत आणि निविदा काढण्यापूर्वीच करण्यात आली आहेत. हेलीपॅडसाठी कोट्यावधीचा खर्च करण्यात आला. रस्त्यांची कामेही नित्कृष्ट असून ते वर्षभर टिकतील का याची शाश्वती नाही. राजकोट किल्ला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे कामही घाईने करण्यात आले असून या किल्ल्याचे दगड पडल्याचे, पुतळ्याकडील टाईल्स सरकल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागानेच केले असून नौदलाचे नाव पुढे केले जात आहे. जनतेच्या पैशाचा अपव्यय करण्यात आला असून या सर्व कामांबाबत आपण माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली आहे. या कामांची तक्रार लोक आयुक्तांकडे करून चौकशीची मागणी करणार असून या सर्व बोगसगिरी बाबत आंदोलनाची भूमिकाही घेऊ, असा इशारा मनसेचे राज्य चिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
मालवण येथील शासकीय विश्रामगृह येथे परशुराम उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मनसेचे विनोद सांडव, अमित इब्रामपूरकर, विल्सन गिरकर, मनसे तालुकाध्यक्ष प्रीतम गावडे, मनसे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष संदीप लाड, प्रतिक कुबल, तथागत मालवणकर, भाग्यश्री लाकडे, जनार्दन आजगांवकर, ओंकार चव्हाण, गौरव लाखम, वैभव आजगांवकर, दिनेश तोंडवळकर, हरेश भिसळे, प्रशांत पराडकर, दुलाजी चवकेकर, राघव परब, हर्षद मिठबावकर, हरेश शिंदे, हर्षद शिंदे, तेजस निकम आदी उपस्थित होते.
नौदल दिन भाजपचा की मोदींचा ?
यावेळी परशुराम उपरकर म्हणाले, नौदल दिन हा भाजपच्या नौदलाचा होता की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नौदलाच होता असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. नौदल कार्यक्रमात पहिल्या दोन रांगांमध्ये भाजपचेच सर्वसामान्य कार्यकर्ते दिसत होते. मात्र जिल्ह्यातील पद्मश्री सन्मान मिळालेल्या परशुराम गंगावणे यांना मात्र मागच्या रांगेत स्थान देण्यात आले होते. हा एक प्रकारे पद्मश्री पुरस्काराचा अवमान असून गंगावणे यांना मानाने पहिल्या रांगेत बसविणे आवश्यक होते मात्र तसे झाले नाही. नौदल दिन हा भाजप पक्षाचाच इव्हेंट असल्याप्रमाणे साजरा झाला अशी टीका उपरकर यांनी केली.
हेलीपॅडवर कोट्यावधी खर्च
नौदल दिन कार्यक्रम सहा महिन्या पूर्वी निश्चित झाला असताना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार असताना अनेक विकास कामे टेंडर न काढताच घाईगडबडीने करण्यात आली. यानिमित्त बांधलेल्या अनेक हेलीपॅड साठी अडीज कोटी हुन अधिक रक्कम खर्ची घालण्यात आली. हेलिपॅड बनवून झाल्यावर निविदा काढून सार्वजनिक बांधकाम विभागाने सोपस्कार पूर्ण केले. कातळावर केवळ हॉटमिक्स टाकून बनविलेल्या या हेलिपॅडना इतका खर्च कसा आला. त्यामुळे ही हेलीपॅडच आता पर्यटन स्थळे बनली आहेत. या कामात जनतेच्या पैशाचा अपव्यय झाला असून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी आमच्यासोबत या हेलीपॅडच्या तपासणी साठी यावे, बांधकाम विभागाने आपला अभियंता आणावा, आम्ही आमचा अभियंता आणतो, असे आव्हान उपरकर यांनी दिले.
रस्ते वर्षभर टिकतील का ?
रस्त्यांची कामेही घाईगडबडीत करण्यात आली आहेत. आनंदव्हाळ येथील बनविलेला रस्ता आताच उखडला आहे. आंगणेवाडी येथील रस्तेही अशाप्रकारे तयार करण्यात आले होते. नौदल दिना निमित्त बनविलेले रस्ते हे वर्षभर टिकतील हे सार्वजनिक बांधकाम विभागाने लिहून द्यावे. जिल्ह्यातील रेल्वेस्थानकाच्या सुशोभीकरणाची कामेही पुण्याची कंपनी आणून घाईमध्ये करण्यात आली. मालवण शासकीय विश्रामगृहाचे कामही कोल्हापूर येथील ठेकेदाराला देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग अशाचप्रकारे टेंडर न काढता घाईगडबडीत कामे करत असून मर्जीतील ठेकेदारांना कामे दिली जात आहेत, जिल्ह्यात ही कामे करणारे ठेकेदार नाहीत का ? असा सवालही उपरकर यांनी उपस्थित केला.
राजकोट किल्ला व शिवपुतळ्याचे कामही घाईने
राजकोट किल्ल्याचे काम राज्य शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागानेच केले आहे. घाईगडबडीत केलेल्या या कामात अनेक त्रुटी असून किल्ल्याचे दगड पडल्याचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडील टाईल्सखाली वाळू भरल्याचे व टाईल्स सरकल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग हे काम नौदलाने केल्याचे सांगून नौदलाचे नाव पुढे करत आहे. शिवरायांच्या पुतळ्याचे फिनिशिंग झालेले नाही. तसेच या पुतळ्याकडे पाहून शिवप्रेमीना छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देण्याचा आवेश येत नाही असे म्हटले जात आहे. शिवरायांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जात असताना हा पुतळा महाराज बोटीत बसून किल्ल्याकडे व आपल्या आरमाराकडे पाहत आहेत अशा स्थितीत असता तर जास्त उचित ठरले असते. नौदल दिनामुळे मालवण बंद राहणार अशा माहितीमुळे नौदल दिनाच्या आधी व नंतर काही दिवस पर्यटक न फिरकल्याने त्याचा परिणाम येथील पर्यटन व्यवसायावर झाला आहे, असेही उपरकर म्हणाले.
नौदल दिना निमित्त विविध विकासकामात जनतेच्या पैशांचा आपव्यय होऊन जनतेला उल्लू बनविण्याचे काम केले गेले असून याबाबत आपण गप्प बसणार नाही, या बोगसगिरी विरोधात आपण आंदोलनाची भूमिका घेणार आहोत, या सर्व कामांची माहिती माहितीच्या अधिकारात आपण घेत आहोत, असेही परशुराम उपरकर म्हणाले.
