⚡बांदा ता.११-: शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात अस्मि प्रवीण मांजरेकर (आरपीडी हायस्कुल, सावंतवाडी) हिने तर लहान गटात माही देविदास सरमळकर (जिल्हा परिषद शाळा, सरमळे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
तिसरी ते चौथी गटासाठी ‘संस्कारकथा’ हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात दुर्वा मनोज राऊळ (जिल्हा परिषद शाळा, माडखोल), तनिष्का संदीप देसाई (जिल्हा परिषद शाळा, बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. मेघराज महेश गवस (दिव्य ज्योती हायस्कुल, बांदा) व सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नंबर १) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला.
पाचवी ते सातवी गटासाठी ‘आपल्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग’ हा विषय देण्यात आला होता. या गटात नैतिक निलेश मोरजकर (खेमराज हायस्कुल, बांदा), रेहन अमित खानोलकर (जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. श्रावणी किशोर गवस (जिल्हा परिषद शाळा, वाफोली) व शमिका अमोघ सिद्ध्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) यांना उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण चंद्रकांत सावंत व सेवानिवृत्त शिक्षक गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.
तत्पूर्वी स्पर्धेचे उदघाटन दीपप्रज्वलन व (कै.) विजयालक्ष्मी विष्णू गावकर व (कै.) बिपीन विष्णू गावकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, कार्यवाह राकेश केसरकर, विशाखा गावकर, संचालक प्रकाश पाणदरे, सौ. स्वप्नीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी प्रवीण मांजरेकर, शिवसेना अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान, शैलेश गवस, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू यांच्यासह पालक, शिक्षक उपस्थित होते. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
