⚡मालवण ता.०९-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जात निहाय जनगणना यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या जात निहाय जनगणनेचा समारोप सावंतवाडी येथे होणार आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागातील जात निहाय जनगणना यात्रेच्या निमित्ताने कुडाळ येथे संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष शंभो म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश सरचिटणीस नंदकुमार कुंभार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय राऊत, ओबीसी विभाग सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष महेश अंधारे, रायगड अध्यक्ष उमेश भोईर, कुडाळचे तालुकाध्यक्ष आनंद पारकर, सरदार ताजर, देवानंद लुडबे, पल्लवी खानोलकर, आनंदी मेस्त्री, विभावरी सुकी, अक्षता खटावकर आदी व इतर उपस्थित होते. या बैठकीत कोकण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने कोकण विभागात जात निहाय जनगणना यात्रा काढण्याचे ठरविण्यात आले. ही यात्रा कोकण विभागात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार असून या यात्रे दरम्यान कॉर्नर मिटींगा होणार आहेत. या यात्रेचा शुभारंभ पेन येथे होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली कुडाळ येथे कॉर्नर सभा झाल्यानंतर सावंतवाडी येथे समारोपाची सभा होणार आहे अशी माहिती महेश अंधारी यांनी दिली आहे.