⚡मालवण ता.०८-: शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, नवी दिल्लीतर्फे आयोजित राज्यस्तरीय कला उत्सव स्पर्धा २१ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत पुणे येथील महात्मा फुले सभागृह, राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्था येथे झाली. या स्पर्धेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहभागी झालेल्या चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यामध्ये दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या वीस विद्यार्थ्यांमध्ये वराडकर हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. सर्वाधिक पारितोषिके मिळविणारी वराडकर हायस्कूल ही राज्यातील एकमेव शाळा ठरली आहे.
या स्पर्धेत वराडकर हायस्कुलच्या श्रेया समीर चांदरकर हिने त्रिमित शिल्प प्रकारात, तर सानिया अनिल कुडतरकर हिने खेळणी बनविणे प्रकारात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला. अवधूत वैभव आचरेकरने पारंपरिक नृत्य व मिथील महेश आंगचेकरने त्रिमित शिल्प प्रकारात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक समीर चांदरकर, शिक्षक भूषण गावडे, नृत्यदिग्दर्शक अरविंद वराडकर यांचे मार्गदर्शन लाभले. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, उपाध्यक्ष आनंद वराडकर, शेखर पेणकर, सचिव सुनील नाईक व विजयश्री देसाई, शालेय समिती अध्यक्ष सुधीर वराडकर, मुख्याध्यापक संजय नाईक आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.