जानवली – कृष्णनगरी येथील मंदिरातून चोरीला गेलेली दत्तमूर्ती गुरुपौर्णिमे दिवशीच सापडली…

पोलीस घटनास्थळी दाखल; पुढील तपास सुरू :मात्र काही प्रश्न हे अनुत्तरितच..

कणकवली : तालुक्यातील जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातून ५ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास चोरीला गेलेली श्री दत्तमूर्ती गुरुवारी गुरु पौर्णिमेच्या दिवशी सकाळी कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत आढळून आली. कृष्णानगरीच्या वॉचमनने याबाबत पोलिसांना माहिती दिली. कणकवली पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करून मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली. गुरुवारी सकाळी ७.४५ वाजण्याच्या सुमारास महामार्गावरून कृष्णनगरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कॉर्नरला एका पिशवीवर ठेवलेल्या स्थितीत ही मूर्ती वॉचमनला दिसून आली.

पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र शेळके, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, श्री. कवटे, प्रकाश कदम, बस्त्याव डिसोजा, विल्सन डिसोजा, डॉमिनिक डिसोजा, सदा राणे, आशिष जामदार, श्री. समदिस्कर, किरण देसाई, सुरेश राठोड, जॅक्सन घोसालवीस तसेच फॉरेन्सिक अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत मूर्तीची पाहणी केली. दरम्यान ही मूर्ती या ठिकाणी कशी आणून ठेवण्यात आली, ती कोणत्या वाहनाने आणण्यात आली, मूर्ती चोरणारे ते चोरटे नेमके कोण, मूर्ती कोणत्या उद्देशाने चोरी केली असावी, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहिले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू होता.

You cannot copy content of this page