अभिनेता अभिनय बेर्डे यांच्या हस्ते उद्घाटन; दीपक केसरकरांसह मान्यवरांची उपस्थिती – युवकांना मार्गदर्शन व रोजगाराच्या संधींवर भर..
⚡सावंतवाडी,ता.११-: येथील वैश्यवाणी समाजाच्या वैभवात भर घालणाऱ्या आणि युवा शक्तीला हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या ‘हिंदू वैश्यवाणी युवा संघटना, सावंतवाडी’ या नूतन संघटनेचा शुभारंभ सोहळा १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४ वाजता गवळी तिठा येथील ‘वैश्यभवन’ येथे हा सोहळा संपन्न होणार असून, यानिमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी जमणार आहे. या संघटनेच्या माध्यमातून समाजातील युवकांना संघटित करणे आणि त्यांच्या प्रगतीसाठी मार्गदर्शन करणे, हा मुख्य हेतू असल्याचे पदाधिकाऱ्यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवा सिने अभिनेता अभिनय लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर उपस्थित राहणार आहेत. तसेच माजी आमदार राजन तेली, माजी नगराध्यक्ष ॲड. दिलीप नार्वेकर, सिंधुदुर्ग जिल्हा वैश्यवाणी समाज अध्यक्ष सुनील भोगटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, सावंतवाडी तालुका वैश्यवाणी समाज अध्यक्ष रमेश बोंद्रे आणि महिला अध्यक्षा सौ. तनुजा पोकळे यांसह समाजातील अन्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
या शुभारंभ सोहळ्यादरम्यान समाजातील गौरवशाली कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आणि जिल्ह्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. युवा शक्तीला एकत्र आणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संघटना कार्यरत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
केवळ संघटना बांधणीच नव्हे तर रोजगाराच्या दृष्टीनेही ही संघटना महत्त्वपूर्ण पावले उचलणार आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना कृतिका कोरगावकर यांनी सांगितले की, समाजातील कोणताही तरुण किंवा तरुणी रोजगारापासून वंचित राहू नये, हा संघटनेचा प्रामाणिक प्रयत्न असेल. यासाठी महिला आणि युवतींसाठी ब्युटी पार्लर कोर्स, केक बनवण्याचे प्रशिक्षण आणि महाविद्यालयीन युवतींसाठी पार्ट-टाइम रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या पत्रकार परिषदेला प्रशांत वाळके, अरुण भिसे सुनील मीशाळ,अमित गवंडळकर, शंभू विरनोडकर, श्रेयस मुंज, कृतिका कोरगावकर, तनुजा पोकळे, कपिल कोरगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
“युवा शक्तीला एकत्र आणून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ही संघटना कटीबद्ध आहे, तरी सर्व समाजबांधवांनी सहकुटुंब या सोहळ्याला उपस्थित राहावे,” असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष व समस्त युवा कार्यकर्त्यांनी केले आहे.
