⚡मालवण ता.११-:
मालवण येथील टोपीवाला हायस्कुल मधील काळे आजींची शिशुविहार बालवाडीचे वार्षिक स्नेहसंमेलन मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे उत्साहात संपन्न झाले. यावेळी बालवाडीच्या चिमुकल्या मुलांनी सादर केलेल्या विविध कलाविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली.
या स्नेहसंमेलनाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्व. काळे आजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी बालवाडीच्या संचालक सौ. मालती काळे व श्रीधर काळे यांच्यासह सर्व शिक्षक व इतर उपस्थित होते. श्रीधर काळे यांनी प्रास्ताविक केले.
भारताचे सांस्कृतिक दर्शन अशी या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. बालवाडीच्या लहान व मोठ्या गटातील चिमुकल्या मुलांनी विविध हिंदी, मराठी, पारंपारिक व लोकगीतांवर नृत्ये सादर करत भारतातील प्रांतिक व सांस्कृतिक विविधता दर्शविताना विविधतेतील एकताही दाखवली. तर काही मुलांनी गायन, अभिनय आणि वक्तृत्व गुणांचे सादरीकरण केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित नृत्याविष्कारानेही उपस्थितांची मने जिंकली.
या मुलांच्या नृत्यांसाठी कोरीयोग्राफर म्हणून सिद्धेश पालव, केतकी सावजी, हर्षदा मेस्त्री , भाग्यश्री फोंडबा, भावना माजिक, सौ. विशाखा परुळेकर तसेच मुख्यशिक्षिका सौ. कमल बांदकर यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. कमल बांदकर, सौ. शर्वरी घाडी, निशा बिडये, सौ. शालन सावंत, स्वप्ना म्हापणकर या शिक्षकांनी मेहनत घेतली. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. आभार श्रीधर काळे यांनी मानले. यावेळी पालक, माजी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो –
मालवण येथील काळे आजींच्या शिशुविहार बालवाडीच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित कलाविष्कार सादर केला, त्याचे छायाचित्र.
(छाया – भूषण मेतर)
