विविध कौशल्य संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगा…

ज्योती मेटे:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे

⚡बांदा ता.०५-: विद्यार्थी दशेमध्ये आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षेची तयारी करा, विविध कौशल्य संपादन करून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगा, यश हे आपलेच आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था च्याअप्पर निबंधक ज्योती मेटे यांनी मडुरा येथे केले. त्या मडुरा हायस्कूलमध्ये सदिच्छा भेटीच्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होत्या.

त्यांच्यासोबत मुंबई बँक माजी व्यवस्थापिका तसेच मराठा को-ऑपरेटिव बँकेच्या माजी अध्यक्ष अनश्री माळगावकर, अमोल माळगावकर, नितीन लाटकर आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश संपादन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात पण मराठी माध्यमातील विद्यार्थीच गरुडझेप घेऊ शकतात, असे प्रतिपादन अनश्री माळगावकर यांनी केले.

“इंग्रजी भाषा हे माध्यम असू शकते, ज्ञान नाही मराठी माध्यमाच्या शाळांमधूनही विद्यार्थी चांगले चमकू शकतात फक्त त्यांना संधीची आवश्यकता असते. त्याचबरोबर आधुनिक काळाशी जुळवून घेणेही ग्रामीण विद्यार्थ्यांना जमले पाहिजे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी अवश्य केला पाहिजे” असे मत ज्योती मेटे यांनी यावेळी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना आधुनिक काळाशी जुळवून घेण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल मडुरा या प्रशालेला पाच संगणक घेण्यासाठी त्यांनी धनादेश दिला.
तत्पूर्वी प्रशालेचे मुख्याध्यापक सुहास वराडकर यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत व सत्कार केला व शाळेची प्रगती मान्यवरांपर्यंत पोहोचवली. या कार्यक्रमाप्रसंगी मडुरा गावचे माजी उपसरपंच उल्हास परब उपस्थित होते. या सर्व मान्यवरांना प्रशालेला सदिच्छा भेट देण्यासाठी नानासाहेब सावंत यांनी विशेष प्रयत्न केले.

You cannot copy content of this page