मासेमारी नौकेवरील मच्छीमार साहित्य नेल्याप्रकरणी अटक केलेल्या 7 जणाना दोन दिवसांची पोलिस कोठडी…

⚡मालवण ता.०२-: तळाशील समोरील समुद्रात पर्ससीन नौकांवर हल्ला करीत नौकांवरील खलाशांना मारहाण करत नौकेवरील मच्छिमारी साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी तळाशील येथील २५ मच्छिमारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी आज पोलिसांनी ७ जणांना अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सातही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवण तळाशिल येथील समुद्रात चार समुद्रात पर्ससीन व पारंपारिक मच्छीमार यांच्यात संघर्ष झाला होता. यामध्ये सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांच्या चिन्मय प्रसाद व प्रथमेश लाड यांच्या पीर सुलेमान या नौका समुद्रात मासेमारी करत असताना तळाशील येथील काही मच्छीमारांनी दोन्ही बोटींवर चढत बोटीवरील खलाशांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचप्रमाणे नौकेवरील दोन मोबाईल सेट, वायरलेस सेट, दोन जी पी एस संच, दोन फिश फाइंडर, २ बिनतारी संदेश यंत्रणा, बॅटरी व अन्य मासेमारी साहित्य मिळून तीन लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल घेऊन गेले होते. या प्रकरणी कृष्णनाथ तांडेल यांनी मालवण पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार तळाशिल येथील २५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात आज कृष्णा कांदळगावकर, अक्षय पवार, प्रथमेश शेलटकर, सुहास चेंदवणकर, रामजी बागवे, करण कांदळगावकर, प्रणय शेलटकर, या सात जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता या सर्वांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली .

याप्रकरणी गुन्ह्यात वापरलेल्या नौका देखील ताब्यात घेण्यात येणार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नितीन नरळे अधिक तपास करीत आहेत.या कामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ऍड तुषार भणगे यांनी काम पाहिले

You cannot copy content of this page