⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील कातवड येथील रवींद्र धोंडू परब यांच्या घराला आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत घरातील कपाटे, रोख रक्कम, दागिने, कपडे, टीव्ही इतर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सुमारे साडे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेवेळी परब कुटुंबीय मोलमजुरी साठी घराबाहेर गेल्याने अनर्थ टळला. यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत आग विझवली. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कातवड येथे रवींद्र परब कुटुंबियांचे घर असून त्यांच्यासह पत्नी सौ. रविना परब, मुलगा साहिल परब हे राहतात. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास परब यांच्या घराला अचानक आग लागून या आगीने मोठे रूप धारण केल्याने घरातील बरेचसे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. आग लागल्याचे समजताच परब यांच्या घराला लागूनच असलेल्या शेजारी व स्थानिकांनी धाव घेत परब यांना याची कल्पना देत आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. पंपाच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून या आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यासाठी गोपाळ बागवे, निलेश परब, निलेश बागवे, परामानंद कदम, आकाश चव्हाण, सोमा धुरी, पिंटो चव्हाण, मंगेश चव्हाण, सौरव कोरगावकर यांनी सहकार्य केले.
यावेळी कोळंबच्या सरपंच सौ. सिया धुरी, उपसरपंच विजय नेमळेकर, तलाठी सुप्रिया शिवलकर, कोतवाल सत्यवान पाताडे, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, निकिता बागवे, नंदा बावकर, पोलीस श्री. सुतार, श्री. पांचाळ यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करून नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी सरपंच सौ. सिया धुरी व उपसरपंच विजय नेमळेकर यांनी परब कुटुंबियांना धीर देत आर्थिक मदत सुपूर्द केली.
