हरी खोबरेकर:कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही..
⚡मालवण ता.२७-: मालवण किनारपट्टी भागातील मच्छीमार, स्थानिक भुमीपुत्र असलेल्यांनी पर्यटन क्षेत्रात उतरून आपला रोजगार उभारला आहे. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या तात्पुरत्या स्वरूपातील झोपड्यांना शासनाने खरे तर संरक्षण देण्याची गरज आहे. मात्र शासन यंत्रणा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचे निमित्त करून या झोपड्या हटविण्याची कारवाई प्रशासन करत आहे, याबाबत मच्छीमारांनी आणि पर्यटन व्यावसायिकांनी जाहीर केलेल्या संघर्षात उद्भव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सक्रीयपणे सहभागी होणार आहे. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या व्यावसायिक झोपड्या बळजबरीने हटविल्या गेल्या तर संघर्षाची ठिणगी उडेल व त्यात ठाकरे सेना उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
मालवण येथे शिवसेना ठाकरे गटाच्या तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक महेंद्र म्हाडगुत, यतीन खोत, नरेश हुले, युवा संघटनेचे सिद्धेश मांजरेकर, दिपक देसाई, अक्षय रेवंडकर, अक्षय भोसले, महेश जावकर आदी उपस्थित होते.
मालवण किनारपट्टीवर मच्छिमारांचा व्यवसाय पिढीजात चालू आहे. मच्छीमार समाज बांधवांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी पिढीजात बांधलेल्या झोपड्या आज तोडण्याचे आदेश शासकीय यंत्रणांना कोणी दिले? हे सर्वप्रथम जाहीर व्हायला हवे. मच्छिमारांसोबतच पर्यटन व्यवसायिकांनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पर्यटन व्यवसायिकांनी स्वतःच्या पैशातून पर्यटन व्यवसाय उभा केला आहे. ज्यांच्या झोपड्या स्व: मालकीच्या आहेत त्यांनाही नोटीसा दिल्या आहेत. आम्ही आजपर्यंत मच्छीमार बांधवांच्या आणि पर्यटन व्यावसायिकांच्या पाठिशी राहून त्यांना संरक्षण देण्याचे काम केले आहे. कोणाच्या पोटावर मारून कोणाला आनंद मिळत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. मच्छिमार व पर्यटन व्यवसायिकांच्या कोणत्याही संघर्षामध्ये आम्ही पुढाकार घेऊ. मच्छीमार बांधव आणि पर्यटन व्यावसायिक ज्या ज्या वेळी आम्हाला साद देतील त्या त्यावेळी आम्ही पुढे उभे राहणार आहोत, असेही हरी खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
