⚡मालवण ता.२६-: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश यात्रे अंतर्गत मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० जणांचे पथक रवाना झाले आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढवून रवाना होणाऱ्या सर्व स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक यांच्या बसला दिल्ली येथील प्रस्थानासाठी हिरवा झेंडा दाखविला.
भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपीय कार्यक्रमानिमित्त केंद्र शासनाकडून मेरी माटी मेरा देश हे अभियान राबविण्यात आले. विकसित भारताचे लक्ष साध्य करणे व मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या शूरवीरांच्या सन्मानार्थ या अभियानाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत देशभरातील सर्व गावे व शहरांतील माती अमृत कलशात संकलित करून पुढे दिल्ली येथे या मातीचा वापर करून शूरवीरांच्या सन्मानार्थ अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.
दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्व आठ नगरपालिकांचा मिळून एक अमृत कलश व सर्व आठ तालुक्यांचे आठ अमृत कलश घेऊन स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक श्री महादेव शिंगाडे रवाना झाले. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमधून माती एकत्रित केलेले अमृत कलश दि. २७ ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान, मुंबई येथे मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील व तेथून पुढे पंतप्रधान यांच्या उपस्थितीत संपन्न होणाऱ्या कार्यक्रमासाठी कर्तव्यपथ दिल्ली येथे रवाना होतील. दिल्ली येथे देशभरातून आलेल्या सर्व गावागावातील, शहरांमधील माती एकत्रित करून अमृत वाटीकेची निर्मिती केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून रवाना झालेल्या स्वयंसेवक व समन्वयक यांना जिल्हाधिकारी किशोर तावडे व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी हिरवा झेंडा दाखविला. यावेळी प्रकल्प संचालक सिंधुदुर्ग उदय पाटील, उपमुख्यकार्यकरी अधिकारी (सामान्य) किशोर काळे, उपमुख्य कार्यकरी अधिकारी (ग्रामपंचायत) विशाल तनपुरे, मालवण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी संतोष जिरगे, बीडीओ अजिंक्य सावंत आदी उपस्थित होते.
