*काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मागणी_
*💫मालवण दि.१०-:* वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक साहाय्य म्हणून मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री अस्लम शेख यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या निधीचे येत्या १५ दिवसात मच्छीमारांना वाटप करावे अशी मागणी मालवण काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मत्स्य विभागाकडे केली आहे. क्यार व महा चक्रीवादळातील ग्रस्त मच्छीमारांना आर्थिक सहाय्य म्हणून मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी आघाडी सरकारच्या माध्यमातून मदत जाहीर केली आहे. समुद्रा जवळील या मच्छीमार कुटुंबातील सदस्यांची रेशनकार्ड अट शिथिल झालेली असल्याने आता तत्काळ मदत देण्यासाठी शासन निर्णयात याबाबत पुन्हा खुलासा करण्यात आला आहे. नुकसानग्रस्त मच्छीमार बांधवांना शासनाने दिलेल्या मदतीचे वाटप लवकरात लवकर व्हावे यासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मालवण येथील सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात सहाय्यक मत्स्यविकास व्यवसाय अधिकारी तेजस्विता करंगुटकर यांची भेट घेऊन लक्ष वेधले. या भेटीवेळी जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, जिल्हा सचिव बाळू अंधारी, मालवण तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, युवक जिल्हाअध्यक्ष देवानंद लुडबे, सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, युवक काँग्रेसच्या विधानसभा मतदार संघ उपाध्यक्षा पल्लवी तारी, मालवण तालुकाध्यक्ष अमृत राऊळ, मालवण शहर अध्यक्ष जेम्स फर्नांडिस, जयमाला मयेकर, गणेश पाडगावकर, सरदार ताजर, योगेश्वर कुर्ले व इतर पदाधिकारी मत्स्यव्यवसाय संघटना पदाधिकारी व मच्छीमार उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ले या तालुक्याना लागून असलेल्या समुद्रात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असून गेल्या दोन वर्षात आलेल्या वादळांमुळे हे मच्छीमार बांधव त्रस्त झाले आहेत त्यात कोरोना रोगाच्या साथी मुळे वर्षभर लॉकडाऊन चा फटका या व्यवसायाला बसला असून मच्छीमारांना आर्थिक भार सहन करावा लागला आहे. गेल्या दोन वर्षात आलेली वादळ बरेच नुकसान करून गेली असून लहान मोठ्या होड्या, बोटी, जाळी यांचे अतोनात नुकसान झाले याची भरपाई म्हणून यापूर्वीच्या सरकार मध्ये जाहीर झालेली शासकीय मदत आज पर्यंत मिळाली नसल्याने आता आमच्या आघाडी सरकारच्या वतीने मंत्री अस्लम शेख यांनी जाहीर केलेली मदत या चालू वर्षात मार्च महिना संपण्यापूर्वी देण्यात यावी अशी मागणी यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मत्स्यव्यवसायाची वर्षभर कोरोना ने कंबरडे मोडून टाकल्यासारखी गत झाली आहे. करोडो रुपयांचा महसूल या सागरी मत्स्यउद्योगांमुळे शासनाला मिळत असून मासेमारी करणारा बांधव मात्र आलेल्या सरकारी मदती पासून दुरावलेला असल्याचं चित्र या किनारपट्टी भागात दिसून येत होत. यात काही प्रमाणात अधिकारी वर्गाचा हलगर्जीपणा ही दिसून येत होता. आता हा आलेला सहाय्यनिधी येत्या १५ दिवसात मच्छीमारांना वाटप करण्यात यावा. शासनाने दिलेला निधी माघारी गेल्यास व कार्यालयीन अधिकारी यांच्या कामात हलगर्जीपणा दिसून आल्यास अधिकाऱ्यांच्या चुका मंत्र्यांच्या व राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणून देणार असा इशारा यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. या जिल्ह्याला पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने मच्छीमार बांधवांची अनेक कामे देखील अडकून पडलेली असून १५ दिवसातून एकदा अधिकारी जर येणार असतील तर या जिल्ह्यातील मच्छीमारांचे भवितव्य देखील त्रासदायक असणार असून मंत्र्यांच्या निदर्शनास ही बाब आम्ही आणून दिली आहे लवकरच यावर हे पद भरण्यात येणार आहे, असे यावेळी काँग्रेस शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना सांगितले.
