बेकायदा दारूची वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई…

10 लाख 88 हजारचा मुद्देमाल जप्त: कोल्हापुरी येथील एक ताब्यात…

⚡बांदा ता.१६-: गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या प्रवाशी मॅक्स गाडीवर उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने ओरोस जिजामाता चौक येथे कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या दारूसह १० लाख ८८ हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तर याप्रकरणी विठ्ठल गोविंद पाटील (वय ३५, रा. कडगाव, ता भुदरगड जि. कोल्हापूर) याला ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची पक्की खबर भरारी पथकाला होती. त्यानुसार भरारी पथकाचे कर्मचारी जिजामाता चौकात ठाण मांडून होते. दरम्यान गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जाणारी मॅक्स प्रवासी वाहतूक करणारी (एमएच ११ वाय १७५८) आली असता त्या गाडीस त्यांनी थांबण्याचा इशारा केला. गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील सीटवर तब्बल ५० दारूचे खोके बेकायदा आढळून आले. मिळून आलेल्या मद्याची किंमत केली असता त्याची किंमत २ लाख ८८ हजार व वाहनांची किंमत ८ लाख असा एकूण १० लाख ८८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला तर बेकायदा दारू वाहतूक केल्या प्रकरणीं एकास ताब्यात घेतले.
ही कारवाई अधीक्षक वैभव वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद जाधव, भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, विशाल सरवटे, वाहन चालक जगन चव्हाण यांनी केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करत आहेत.

You cannot copy content of this page