मंगेश गावकर:नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी..
⚡मालवण ता.०९-: मालवणात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच असून भटक्या कुत्र्यांच्या संचाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.दोन तीन वर्षांपूर्वी। नगरपालिकेकडून एक दोन वेळा कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम राबविली गेल्यानंतरही कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य न ठेवल्यानेच कुत्र्यांची संख्या वाढत असून नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी मालवण आडारी येथील नागरिक मंगेश गावकर यांनी केली आहे.
मालवणात भटक्या कुत्र्यांचा संचार ही गेले अनेक वर्षे मालवण शहरवासियांची डोकेदुखी बनली आहे. मालवणातील रस्त्यावर तसेच गल्लीबोळात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचा त्रास वाहनचालक, पादचारी, व लहान मुलांना होत आहे. मात्र कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत नगरपालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याने याविरोधात आडारी येथील नागरिक मंगेश गावकर यांनी आवाज उठवला आहे. काही वर्षा पूर्वी मालवण नगरपालिकेने सुरु केलेली कुत्रे निर्बीजीकरण मोहीम काही दिवस सुरु राहून नंतर बंद पडली. तर अलीकडच्या दोन वर्षात रोटरी क्लब व इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने कुत्रे निर्बीजीकरण मोहीम घेण्यात आली. मात्र या मोहिमाता राबवूनही मालवण शहरातील कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आलेली नाही. तसेच नगरपालिका प्रशासन देखील या समस्येकडे गांभीर्याने पाहत नाही, असे मंगेश गावकर यांनी म्हटले आहे.
रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांमुळे वाहनचालकांना त्रास होत असून अपघातही घडत आहेत. तसेच कुत्रे अंगावर धावून येणे तसेच चावा घेऊन जखमी करणे अशा घटना घडत असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने कुत्र्यांच्या बंदोबस्ता साठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंगेश गावकर यांनी केली आहे..
