सचिन तावडे:कर वाढ त्वरित मागे घ्या;अन्यथा सह्यांची मोहीम राबवून जनप्रक्षोभ आंदोलन..
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी नगरपंचायतीने कोणत्याही सुविधा न देता तिप्पट कर वाढ केली आहे. ही कर वाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून जनप्रक्षोभ आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी दिला आहे.
नगरपंचायतीने करात तिप्पट वाढ केली आहे. नागरिकांना कोणत्याही सुविधा न देता केवळ कर वाढ करणे चुकीचे आहे. नगरपंचायतीत ठराव घेताना नगरसेवक आपल्या प्रभागातील जनतेला कोणत्या सुविधा मिळत आहेत हे पहिले जात नाही. सध्या प्रत्येक प्रभागात अस्वच्छता आहे. जागोजागी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. सफाई कामगार ठराविक लोकांच्या दिमतीला असल्या सारखे काम करीत आहेत. मग जनतेकडून घेतला जाणारा स्वच्छता कर जातो कुठे असा सवाल उपस्थित केला आहे.
प्रत्येक ठिकाणी चिखलाने भरलेली डबकी दिसत आहेत. सांडपाणी उघड्यावर सोडले जात आहे. शहरात सध्या डेंग्यू मलेरियाचे रुग्ण वाढत असताना त्याच्या नियंत्रणाकरिता कोणतीही फवारणी केलेली नाही. मुळात आरोग्य सभापती यांना आपलें काम काय आहे याची माहिती नसल्याचा टोला तावडे यांनी लागवला आहे.
नगरपंचायतकडे आरोग्य विषयक कोणती साधने आहेत का मग आरोग्य कर का घेतला जातो असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
गणेशोत्सवात घाई गडबडीने दिवा बत्ती सुरु करण्यात आली. परंतु नंतरची परिस्थिती जनतेला माहित आहे. तरीही वीज कराच्या रूपाने नागरिकांची लूट सुरु असल्याचा आरोप तावडे यांनी केला आहे.
प्रभागात नीट रस्ता नाही. पाण्याचे नियोजन नाही. नगरसेवक ठेकेदारी करीत आहेत. त्यामुळे आंधळं दळतंय कुत्र पीठ खातोय अशी दयनीय अवस्था नगरपंच्यातीची आहे.
प्रथम आपला कारभार सुधारा. जनतेला सेवा सुविधा द्या. त्यानंतरच कर वाढ करा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा तावडे प्रसिध्दी पञाद्वारे दिला आहे.
