पालकमंत्री उदय सामंत : जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूद ; सिंधुरत्न योजनेसाठी ३०० कोटी :
सिंधूदुर्गनगरी ता ९ राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्हा शासकीय रुग्णालयसाठी भरीव तरतूदीसह सिंधु-रत्न योजनेसाठी ३०० कोटिंची तरतूद करण्यात आली आहे. मालवण शासकीय तंत्रनिकेतमध्ये कौशल्य विकाससाठी २५ कोटी रुपये आणि सिंचनसाठी ३०१ कोटी रुपये तसेच शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने सिंधूदुर्ग जिल्ह्याला हा अर्थसंकल्प विकासात्मक पुढे नेणारा आहे, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यानी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. पालकमंत्री सामंत यानी मंत्रालयातून ऑनलाईन पद्धतीने मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. सोमवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात सिंधूदुर्ग जिल्ह्याला काय मिळाले ? याची माहिती देण्यासाठी आयोजित या पत्रकार परिषदेत मंत्री सामंत यानी, आपण पालकमंत्री म्हणून सिंधूदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारल्या नंतर दिलेले शब्द पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प ठरला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले. यावेळी त्यांनी हा अर्थसंकल्प कोकणासह महाराष्ट्र राज्याच्या विकासाला चालना देणारा असल्याचे सांगितले. यावेळी पुढे बोलताना मंत्री सामंत यानी, मी वारंवार सांगत होतो. कोरोनामुळे अपेक्षित निधी मिळत नाही. त्यामुळे विकास करता येत नाही. कालच्या अर्थसंकल्पात ही मर्यादा ओलांडता आली. कोविड कमी झाल्याने हा फायदा झाला आहे. सिंधु-रत्न विकास योजनेसाठी ३०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. पुढील तीन वर्षात हा निधी खर्च करायचा आहे. शासकीय मेडिकल कॉलेजसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. बंदर विकासासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. कर्करोगाचे निदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंचनासाठी ३०१ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याने जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प मार्गी लागण्यास मदत मिळणार आहे, असे यावेळी सांगितले. मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम व येथील इमारत दुरुस्ती यासाठी २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्ह्याचा १४३ कोटिंचा वार्षिक आराखडा १७० करण्यात आला आहे. मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सिंधूदुर्ग जिल्ह्यात होणार असून त्याची निश्चिती आठ ते दहा दिवसांत करण्यात येणार आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले येथील स्मारकसाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे, असेही यावेळी मंत्री सामंत यानी सांगितले.
