हिंदू धर्म विश्व गुरु होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही शिवशौर्य यात्रा…

विवेक कुलकर्णी:शिवरायांच्या शिकवणीचा अभ्यास आणि त्यांचे आचरण प्रत्येकाने करावे…

मालवण (प्रतिनिधी)

भारतावर होणारी परकीय आक्रमणे परतवून लावत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. यामुळे हिंदूंना स्वतःचे स्वराज्य आणि स्वतःचा राजा मिळाला. आजही देशावर आणि हिंदूंवर अनेक बाजूनी आक्रमणे होत असून हिंदू धर्माचे संरक्षण आणि त्यांचे सामर्थ्य जगासमोर दाखविण्यासाठी तरुणांमध्ये स्फूर्ती निर्माण करण्याचे कार्य विश्व हिंदू परिषद व बजरंग दल करत आहे. हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे जागरण करण्यासाठी आणि अखंड भारत होण्यासाठी आज शिवशौर्य यात्रा काढण्यात येत आहे. तरुणांमध्ये शौर्याचे जागरण करून पुन्हा एकदा हिंदूंचा बलाढ्य व बलदंड इतिहास निर्माण व्हावा यासाठी आणि हिंदू धर्म विश्व गुरु होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही शिवशौर्य यात्रा आहे, असे प्रतिपादन बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी यांनी येथे बोलताना केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष, विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेची ६० वर्षे याचा योग साधून विश्व हिंदू परिषद, बजरंग दल कोकण प्रांत यांच्यावतीने ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दोडामार्ग ते शिवाजी पार्क मुंबई अशा शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काल सायंकाळी उशिरा शिवशौर्य यात्रा मालवण तालुक्यात दाखल झाली. ढोलताशांच्या गजरात कुंभारमाठ येथे शिवशौर्य यात्रेचे स्वागत करण्यात आले. कुंभारमाठ ते मामा वरेरकर नाट्यगृहापर्यंत दुचाकीची रॅली काढण्यात आली. मामा वरेरकर नाट्यगृह येथे रॅलीची सांगता झाल्यावर नाट्यगृहात रात्री उशिरा जाहीर सभा झाली. या सभेचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष रघुनाथ धूळप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी बजरंग दलाचे क्षेत्रीय संयोजक व प्रमुख वक्ते विवेक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष डॉ. पंकज दिघे, माजी खासदार नीलेश राणे, दत्ता सामंत, संदीप भगत, राजेंद्र पवार, विवेक वैद्य, भाऊ सामंत, आनंद प्रभू, बबन शिंदे, हरी खोबरेकर, राजू आंबेरकर, आनंद आचरेकर, विद्याधर मेस्त्री, अशोक सावंत, बाळासाहेब पंतवालावलकर, मंगेश शेर्लेकर, संतोष लुडबे, विश्व हिंदू परिषदेचे मालवण प्रखंड मंत्री सुनिल पोळ, शिवशौर्य यात्रा सिंधुदुर्ग सहसंयोजक संदीप बोडवे, मालवण प्रखंड सत्संग प्रमुख प्रभुदास आजगावकर, मालवण प्रखंड मातृशक्ती प्रमुख वैदही जुवाटकर, विजय केनवडेकर आदी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी विवेक कुलकर्णी म्हणाले, शिव राज्यभिषेकाचे यंदाचे ३५० वर्ष आहे. हिंदू समाजाचे संघटन करीत निरंतन कार्यरत असलेल्या विश्व हिंदू परिषदेलाही यंदा ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवशौर्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू समाजातील तरुणांना संघटित करून त्यांच्यामध्ये जागृती आणण्यासाठी ही यात्रा महत्वाची कामगिरी बजावणार आहे, शिवरायांच्या शिकवणीचा अभ्यास आणि त्यांचे आचरण प्रत्येकाने करावे, यासाठी आम्ही घराघरात पोहचणार आहोत, देशहितासाठी लढाणारा तरुण निर्माण करण्यासाठी गावागावात बजरंग दलाच्या शाखा निर्माण करणार आहोत, असेही कुलकर्णी म्हणाले.

हिंदू धर्मावर आजही अनेक बाजूनी आक्रमणे होत आहेत. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेने देशात चैतन्य आले. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरोधात, लव जिहाद, लँड जिहाद व गोवंश हत्या या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते अनेक ठिकाणी आंदोलने करीत आहेत. अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अनेकांवर हल्ले झाले आहेत. तरीही बजरंग दलाचे कार्यकर्ते मागे हटणार नाहीत. हिंदू समाज बांधवांच्या रक्षणासाठी सदैव बजरंग दल पुढे असणार आहे. हिंदू धर्मात कोणतीही जात पात राहिलेली नाही. हिंदू समाज एक आहे आणि फक्त अखंड भारतासाठी बजरंग दलाचा लढा आहे. हिंदूंमध्ये जागरण करण्यासाठी ही शौर्ययात्रा आहे, असेही विवेक कुलकर्णी म्हणाले.

यावेळी माजी खासदार नीलेश राणे म्हणाले, अनेक संकटात हिंदू विश्व परिषद व बजरंग दल यांच्यामुळे हिंदू वाचला आहे. हिंदू समाज घडविण्यासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे मोठे कार्य आहे. ज्या ज्या वेळी हिंदू समाजासाठी झटणाऱ्या माणसांची गरज असेल त्या त्या वेळी सर्व हिंदूनी एकत्रित होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी उपस्थित मान्यवरांचा तसेच हिंदू धर्मातील विविध ज्ञाती संघटनांच्या मालवण पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अष्टपैलू कलानिकेतनच्या कलाकारांनी शिवगीते व शिवप्रार्थना सादर केली. तर दिक्षा लुडबे हिने शिवगर्जना तर गौरी सामंत यांनी पसायदान सादर केले. सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. आभार भाऊ सामंत यांनी मानले.

You cannot copy content of this page