चाकरमान्यांचे स्वागत करण्याचा कणकवली तालुका प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य

तहसीलदार दीक्षांत देशपांडे; संघाला सर्व प्रकारचे सहकार्य

⚡कणकवली ता.१७-: कोकणातील महाउत्सव असलेला गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होत आहेत. त्यांचे स्वागत करण्याचा कणकवली तालुका प्रवासी संघाचा उपक्रम स्तुत्य असून प्रवाशांच्या विविध प्रश्न व समस्यांवर आवाज उठविणार हा संघ आहे. संघाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.

गणेशोत्सवासाठी विविध शहरांतून प्रवासी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. त्या सर्व प्रवाशांचे आणि त्यांना घेऊन येणाऱ्या चालकांचे कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे रविवारी येथील आप्पासाहेब पटवर्धन चौकात गुलाबपुष्प व गोड पदार्थ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील, मोटार वाहन निरीक्षक अरुण पाटील, विनोद भोपळे, आरटीओचे कर्मचारी नागेश बंदरकर, तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष रमेश जोगळे, सखाराम सपकाळ, संजय मालंडकर, ऋषिकेश कोरडे, भालचंद्र मराठे, सुरेश देसाई, वाहतूक पोलीस विनोद चव्हाण, आर. के. पाटील, अमित मयेकर, योगेश मुंज, श्रद्धा कदम, सुजाता पालयेकर, रोटरी क्लब, कणकवलीचे अध्यक्ष रवी परब, सी. आर. चव्हाण, महानंदा चव्हाण, अनिल परब आदी उपस्थित होते.

संदेश पारकर म्हणाले, कोकणात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. हा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी लाखो चाकरमानी कोकणात येतात. चाकरमानी, प्रवासी व त्यांना सुखरूपपणे आणणाऱ्या चालकांचे कणकवली तालुका प्रवासी संघातर्फे स्वागत केले जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे. प्रवासी संघ प्रवाशांच्या प्रश्न व समस्यांना गेले कित्येकवर्षे वाच्या फोडण्याचे काम करीत आहे. संघाचे हे कार्य अतुलनीय आहे.

अरुण पाटील म्हणाले, लवकर या, सावकाश जा आणि सुरक्षित पोहचा, असे संदेश देत चाकरमानी, प्रवाशांना सुखरूपपणे आणणाऱ्या चालकांना गुलाबपुष्ष देऊन त्यांचे स्वागत करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. मनोज पाटील यांनी तालुका प्रवासी संघाच्या या उपक्रमाचे कौतूक केले. डॉ. विद्याधर तायशेटे यांनी प्रवासी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना आरोग्य संबंधी मदत देण्याची ग्वाही दिली.

आरंभी मान्यवरांचे स्वागत प्रवासी संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी केले. प्रास्ताविकेत मनोहर पालयेकर यांनी तालुका प्रवासी संघाच्या कार्य व उपक्रमांची माहिती दिली. सूत्रसंचालन रमेश जोगळे यांनी केले. आभार दादा कुडतरकर यांनी मानले. त्यानंतर आप्पासाहेब पटवर्धन चौकात दाखल झालेल्या प्रवाशांचे व त्यांना सुखरूपपणे आणल्याबद्दल चालकांचे उपस्थितांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

You cannot copy content of this page