साकेडी येथे पोलीस निरीक्षक अमित यादव यांचे उद्गार
⚡कणकवली ता.१०-: गावातले तंटे गावातच मिटले जावेत या उद्देशाने तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी तंटामुक्त गाव समिती ची संकल्पना सत्यात आणली. जेणेकरून न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वेळ व पैसा वाया न जाता त्याचा फायदा ग्रामस्थांना होतो. साकेडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे बैठक आयोजन करून एक स्तुत्य उपक्रम राबवला आहे. साकेडीमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन यासह अन्य धर्मीय एकत्रित गुण्या गोविंदाने नांदतात. ही गावच्या दृष्टीने मोठी जमेची बाजू आहे. असे उद्गार कणकवली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी काढले.
साकेडी गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची बैठक समितीचे अध्यक्ष राजू सदडेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये घेण्यात आली. यावेळी या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. यादव बोलत होते. याप्रसंगी तंटामुक्त गाव समिती चे सदस्य सरपंच सुरेश साटम, उपसरपंच वर्दम, पोलीस पाटील सुनील कदम, माजी उपसरपंच महंमद जेऊर शेख, माजी सरपंच सुविधा गुरव, ग्रामपंचायत सदस्य दिगंबर वालावलकर, समिती सदस्य विजिन जाधव, मुरारी राणे, किरण वर्दम, आनंदी परब, उषा गाड, फ्रान्सिस भुतेलो, रामकृष्ण गुरव, विनोद जाधव, तुकाराम ढवण, वसंत ढवण, कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किरण मेथे ग्रामपंचायत कर्मचारी रोहित राणे, यांच्यासह अन्य उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक श्री. यादव यांचे स्वागत समितीचे अध्यक्ष श्री सदडेकर, व श्री साटम यांनी केले. यावेळी बोलताना श्री. यादव यांनी तंटामुक्त गाव म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल साकेडी गावचे कौतुक केले. गावाला पुरस्कार मिळाला तर तुमच्या गावांमध्ये वाद असण्याचा प्रश्नच नाही. असे गौरव उद्गार त्यांनी काढले. गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्याकरिता पोलीस प्रशासनाकडून आवश्यकता सर्व उपयोजना केल्या जात आहेत. गावातील लोक खरेदी करिता ज्यावेळी तालुका स्तरावर येतात त्यांनी त्यांना हे नियोजन माहिती असण्याची गरज आहे. जेणेकरून लोकांना कोणताही त्रास होऊ नये. या दृष्टीने पोलीस सर्वतोपरी काळजी घेत आहेत. वाहतूक कोंडीच्या दृष्टीने देखील कोणतीही समस्या निर्माण होऊ नये हे आमचे प्रयत्न आहेत. असे श्री यादव यांनी याप्रसंगी सांगितले. महसूल, नगरपालिका प्रशासनाची व आमची या नियोजना संदर्भात सातत्याने चर्चा असून सर्वांच्या सहकार्याने हे नियोजन यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. गणेशोत्सव हा आपल्या कोकणातील सर्वात मोठा असलेला सण व यासोबत येणारा ईद-ए-मिलाद हा सण देखील सर्वांनी उत्साहाने साजरा करूया असे आवाहन यावेळी श्री. यादव यांनी केले. उत्सव कालावधीत किंवा त्यानंतर देखील कोणतीही समस्या घेऊन हक्काने पोलीस स्टेशनमध्ये या. पोलीस प्रशासन आपल्यासाठी सदैव तत्पर राहील असेही श्री. यादव यांनी याप्रसंगी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दिगंबर वालावलकर यांनी मांडले.