⚡मालवण ता.१०-: मालवण तालुक्यातील चिंदर येथील जिल्हापरिषद शाळा चिंदर बाजार येथे प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत पालक व महिलांसाठी शाळेस्तरीय तृणधान्य पाककला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत सौ. रेखा फर्नांडिस यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सौ. अवनी पडवळ व तृतीय क्रमांक सौ. श्रुती जाधव यांनी मिळविला.
शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व इतर शिक्षकांच्या सहकार्याने ही स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये उत्तेजनार्थ म्हणून सौ. दामिनी बेहेरे व सौ. दुर्वा चिंदरकर यांची निवड करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षण माजी शिक्षिका व कोमसापच्या सभासद साहित्यिका सौ. वैभवी चौकेकर यांनी केले. चौकेकर यांनी सहभागी स्पर्धकांना मार्गदर्शनही केले. प्रथम तीन विजेते व उत्तेजनार्थ स्पर्धक यांना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले.
तसेच मुख्याध्यापिका स्मिता जोशी यांच्या संकल्पनेतून मुलांसाठी कागदी फुले बनविण्याचे प्रशिक्षणही घेण्यात आले. या प्रशिक्षणातही सौ. वैभवी चौकेकर यांनी मुलांना विविध प्रकारची कागदी फुले बनविण्यास शिकविले. या प्रशिक्षणाला मुलांबरोबरच पालकांचाही प्रतिसाद लाभला.