⚡मालवण ता.०६-: मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात गोकुळाष्टमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करून आरती व भजन करण्यात आले. यानिमित्त प्रशालेचा विद्यार्थी पार्थ मेस्त्री याने रेखाटलेली बाळकृष्णाची रांगोळी सर्वांचे आकर्षण ठरली. तर कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थिनींनी पारंपारिक गीतांच्या तालावर नृत्या व फुगड्या सादर करत या उत्सवात रंगत आणली.
गोकुळाष्टमी उत्सवनिमित्त भंडारी हायस्कुलच्या मध्यवर्ती सभागृहात श्री कृष्ण मूर्तीची स्थापना करून आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक हणमंत तिवले यांच्या हस्ते मूर्तीचे पूजन करून आरती करण्यात आली. यावेळी प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त प्रशालेचा इयत्ता दहावी मधील विद्यार्थी पार्थ साईनाथ मेस्त्री यांनी अल्लड बाळकृष्णाची आकर्षक रांगोळी साकारली होती. ही रांगोळी लक्षवेधी ठरली. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. पवन बांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुस्वर भजने सादर केली. तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी नऊवारी साड्यांची पारंपारिक वेशभूषा परिधान करत विविध पारंपारिक गीते म्हणत नृत्य केले. तसेच फुगड्याही सादर केल्या.
