⚡मालवण ता.२२-: रत्नागिरी येथील राधाकृष्ण मंदिर वैश्य संस्थेने दि. १९, २० ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत पृथा पर्रिकर, (गोवा) हिने एकेरी आणि गौतम वाडकर, सावंतवाडीच्या साथीने दुहेरीतही विजेतेपद मिळवून आपल्या शिरपेचात दुहेरी मुकुट खोवला. दुहेरीत इशांत वेंगुर्लेकर (मालवण) याने बसाक मॅडम यांच्या साथीने दुहेरीचे उपविजेतेपद मिळविले.
ही स्पर्धा १५ वर्षांखालील मुले, मुली आणि खुल्या गटात पुरुष व महिला एकत्र अशी एकेरी व दुहेरी गटात घेण्यात आली. यामध्ये १५ वर्षांखालील मुली : प्रथम आरोही चांदे (कोल्हापूर), द्वितीय : माही सावंत (रत्नागिरी), १५ वर्षांखालील मुले – प्रथम सर्वेश पाटील (कोल्हापूर), द्वितीय सोहम खोत (कोल्हापूर). एकेरी खुला गट- प्रथम- पृथा पर्रिकर (गोवा), द्वितीय मनीष पिंगे (कोल्हापूर). दुहेरी खुला गट- प्रथम पृथा पर्रिकर (गोवा) आणि गौतम वाडकर (सावंतवाडी). द्वितीय बसाक मॅडम (कोल्हापूर) आणि इशांत वेंगुर्लेकर (मालवण) यांनी यश मिळविले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर जाऊन टेबल टेनिसमध्ये यश संपादन केल्याबद्दल महासिंधु टेबल टेनिस असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विष्णू कोरगावकर आणि सचिव हेमंत वालकर यांनी ईशांत वेंगुर्लेकर आणि गौतम वाडकर यांचे अभिनंदन केले.
