⚡बांदा ता.२०-: भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पाहरा देत असलेल्या जवानांसाठी जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या वतीने राख्या पाठविण्यात आल्या.
एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम बांदा केंद्र शाळेत गेली अनेक वर्षे चालू असून या उपक्रमांतर्गत स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्यात येतात.१८५३साली स्थापन झालेल्या शाळेला चालू वर्षी १७०वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी १७० राख्या जवानांसाठी बांदा येथील पोस्ट ऑफीसमधून पाठवण्यात आल्या.
बहीण भावाचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला राख्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे . देशसेवेसाठी तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला येणे शक्य होत नाही . देशाच्या सीमेवर असलेल्या भावांचा उत्साह वाढावा आणि बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या पाठविल्या आहेत.
प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील हे गेली अनेक वर्षे सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबवित असून या उपक्रमाला मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, पदवीधर शिक्षिका स्नेहा गाडी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब,शांताराम असनकर,प्रदिप सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे ,सपना गायकवाड तसेच बांदा येथील पोस्ट ऑफीस कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.
