संभाव्य भरतीत एकूण पदांच्या १० टक्के जागा मिळण्याची शक्यता: मराठा, मुस्लिम, ख्रिश्चनांनी आवाज उठविण्याची गरज;कुडाळ युवा सेना प्रमुख योगेश धुरी यांचे आवाहन
कुडाळ, प्रतिनिधी-:सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उपशिक्षक प्राथमिक विभागांमध्ये एकूण ३ हजार ७८५ पदे मंजूर आहेत. यापैकी अनुसूचित जातीचे ३२७, अनुसूचित जमातीचे ५१ पदे, विमुक्त जातीचे ५१ पदे, भटक्या जमातीचे ९५ पदे भरलेली आहेत. भटक्या जमाती क वर्गाची १०० पद भरलेली असून भटक्या जमाती ड ३३ पदे भरलेली आहेत. विशेष मागास प्रवर्गाचे ६८ पदे भरलेली आहेत इतर मागासवर्गांची ४१९ पदे तर ईडब्ल्यूएस आर्थिक मागासवर्गीय वर्गामध्ये फक्त दोन पदे भरलेली आहेत. यानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २७०७ पदे ही प्राथमिक शिक्षकांची भरलेली आहेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षकांची भरावयाची पदे १ हजार ७८ आहेत. वास्तविक पाहता आर्थिक मागासवर्गीय प्रवर्गाची एकूण मंजूर पदे पाहता ३७८ पदे ही रिकामी आहेत. यापैकी २०१९ च्या भरतीमध्ये दोन पदे भरलेली आहेत. म्हणजेच आजच्या घडीला ३७६ पदेही आर्थिक मागास वर्गामध्ये रिक्त असली पाहिजेत. परंतु, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने रिक्त पदे १ हजार ७८ मानून त्यापैकी १० टक्के जागा आर्थिक आर्थिक मागासवर्गीयांना म्हणून ११४ पदे रिक्त असल्याची दाखवलेली आहेत. आर्थिक मागासवर्गीयांना देण्यात येणारे आरक्षण हे एकूण मंजूर पदांमधून देणे आवश्यक होते. परंतु, खुल्या प्रवर्ग व आर्थिक मागासवर्गीयांच्या हक्काच्या आरक्षणावर डल्ला मारण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये बसलेले झारीतले शुक्राचार्य यांनी चुकीचा अर्थ लावून जवळजवळ आर्थिक दुर्बल घटकांच्या सुमारे २६२ पदांवर डल्ला मारलेला आहे. यामुळे मराठा त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गात येणारे सर्व हिंदू समाजाची लोक ख्रिश्चन, मुस्लिम यांच्या नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. याविरुद्ध आवाज उठविला नाही तर भविष्यात खुल्या प्रवर्गातील लोकांना शासकीय नोकरीमध्ये नोकऱ्याच मिळणार नाहीत, असे कुडाळ तालुका युवासेना प्रमुख योगेश धुरी यांनी म्हटले आहे.
हे सरकार सर्वसामान्यांचे नाही, तुमचे आमचे सरकार नाही. आता तरी जागे व्हा. या सरकारला हद्दपार करा हे भाजपवाले, गद्दार मिंधे गट मतापुरते तुमच्या दारावर येणार असून त्यांना हाकलवून लावा, असे आवाहन युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केले आहे.
