संतोष लुडबे; चौथा वर्धापन दिन संपन्न
⚡मालवण ता.१६-: समाजात बारकाईने पाहिले तर अनेक माणसे ही परिस्थितीशी झगडत जीवन व्यतीत करत असतात. आपण सुखाने जगत असलो तरी समाजातील अशा माणसांकडेही आपण लक्ष देऊन आपल्याला जमेल तशी मदत आपण केली पाहिजे. याच उद्दिष्टाने मातृत्व आधार फाउंडेशनची स्थापना होऊन गेली चार वर्ष ही संस्था समाजातील तळागाळातील गरजू लोकांसाठी कार्यरत आहे. गरीब व गरजू लोकांच्या जीवनात आनंद व सुख आणणे हेच मातृत्व आधार फाउंडेशनचे काम आहे, असे प्रतिपादन मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांनी येथे बोलताना केले.
मालवण मधील मातृत्व आधार फाउंडेशन या सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन आज स्वातंत्र्यदिनी वायरी येथील केळबाई मंदिराच्या मंगल कार्यालयात संपन्न झाला. यावेळी ज्येष्ठ नागरिक श्रीमती आजगावकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार शेखर सामंत, मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण, फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास हडकर, जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष बाबा मोंडकर, वायरी भूतनाथचे सरपंच भगवान लुडबे, माजी नगरसेवक मंदार केणी, उद्योजक सागर वाडकर, दशरथ कवटकर, माजी नगरसेविका तृप्ती मयेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रफुल्ल देसाई यांनी प्रास्ताविक करत मातृत्व आधार फाउंडेशच्या कार्याची माहिती दिली. यावेळी मालवण शहरातील आडवण वायरी, अंगणवाडीतील मृण्मयी जाधव (भारत माता) , पार्थ राणे (शेतकरी) दुर्वांक गवस (डॉक्टर ) , ऍलेक्स फर्नांडिस ( डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) तनीषा जाधव (शिक्षका) यांनी वेशभूषा करुन उपस्थितांची मने जिकली या मुलाना मार्गदर्शन मुलांचे पालक व अंगणवाडी शिक्षिका – सुवर्णा चव्हाण यांनी केले तर दिक्षा लुडबे, सौम्या कुर्ले यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी मालवण मधील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पराडकर उर्फ ढोले बाबू यांच्या डोळ्यांच्या उपचारासाठी मातृत्व आधार फाउंडेशनच्या पुढाकाराने गोळा केलेली आर्थिक मदत ढोले बाबू यांना मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. तसेच तांडेल व पाडावे या दोन गरीब कुटुंबाना आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली. मालवण मधील दहावी, बारावी व स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी विलास हडकर यांनी टीव्ही व मोबाईल यांच्यामुळे मानवी जीवनात अनेक चांगले – वाईट बदल झाले आहेत, बदलत्या काळात नवीन पिढीला समाजाप्रति जागरूक ठेवण्यासाठी मातृत्व आधार फाउंडेशनचे कार्य महत्वाचे असे सांगितले. साईनाथ चव्हाण यांनी संतोष लुडबे व मातृत्व आधार फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत लुडबे यांचे कार्य हे समाजाला वाहून घेतलेले आहे, असे सांगितले. मंदार केणी यांनी मातृत्व आधार फाउंडेशनच्या माध्यमातून संतोष लुडबे व त्यांचे सहकारी समाजासाठी कार्य करत असून असे कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी राहिले पाहिजे, असे सांगितले. भाई गोवेकर यांनी समाजातील लोकांच्या गरजा ओळखून मातृत्व आधार फाउंडेशन जे समाज कार्य करत आहे, ते उल्लेखनीय आहे, असे सांगितले. तर शेखर सामंत यांनी मातृत्व आधार फाउंडेशनने आज ढोले बाबू यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याला मदत केली, आपल्या आजूबाजूला असे अनेक ढोले बाबू असून त्यांना ओळखून त्यांना मदत केली पाहिजे असे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबू ढोले यांनी आपण दुसऱ्यांची सेवा करण्याचे काम केले मात्र, जेव्हा माझी प्रकृती साथ देईनाशी झाली त्यावेळी मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे व त्यांची पत्नी उमा लुडबे आणि फाउंडेशनचे संचालक हे मला मदत करण्यासाठी धावून आले त्यांचे ऋण मी विसरू शकत नाही असे सांगितले.
सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. आभार अक्षय सातार्डेकर यांनी मानले. यावेळी दादा वेंगुर्लेकर, राजन कुमठेकर, सुरेश बापर्डेकर, बाबा मोरजकर, शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, श्रीमत मंडलिक, दिक्षा गावकर, राधिका मोंडकर, सोनाली पाटकर, मंगेश सावन्त , संदीप नेवाळकर, दीपक कुडाळकर, पत्रकार संतोष गावडे ,पत्रकार भूषण मेतर , संदीप बोडवे , जगदीश तोडणकर, गौरी सातरडेकर, अंगणवाडी शिक्षिका सुवर्णा चव्हाण , प्रिया राणे आदी व इतर उपस्थित होते.
