बांदा/प्रतिनिधी
सोमवारी बांदा शहराच्या आठवडा बाजारादिवशी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून सायंकाळच्या वेळी कचरा तेथेच टाकण्यात येत असल्याने आळवाडी मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त होते. स्थानिक प्रशासनाला कचरा उचलताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आज सकाळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आठवडा बाजारात जाऊन व्यापाऱ्यांना सक्त सूचना दिल्यात.
तसेच सूचनांचे पालन न करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
बांदा शहरात कचऱ्याची समस्या जटील आहे. शहराचा आठवडा बाजार सोमवारी आळवाडी मैदानात भरविण्यात येतो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सायंकाळी बाजार आटोपल्यानंतर याठिकाणीच उरलेली भाजी व कचरा हा अस्तव्यस्त टाकण्यात येतो. यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सफाई कामगारांना कचरा उचलण्यास त्रास सहन करावा लागतो. याबाबतच्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. तानुसार काही महिन्यांपूर्वी विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विक्रेत्यांनी सूचनांचे पालन देखील केले होते. मात्र कचरा तेथेच टाकण्याच्या घटना पुन्हा घडू लागल्याने थेट ग्रामपंचायत प्रशासनालाच रस्त्यावर उतरावे लागले.
यासाठी आज सकाळीच सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब, ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, रिया येडवे, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर यांनी आठवडा बाजारात येत व्यापाऱ्यांना सक्त सूचना दिल्यात.
विक्रेत्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यास दांडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
