⚡दोडामार्ग ता.१२-: केर – भेकुर्ली ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या श्रावणधारा महोत्सवात खास माहेरवाशीणीसाठी ठेवलेल्या माझ्या माहेरची साडी या स्पर्धेत रसिका श्रीकृष्ण गवस यांनी प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.गावाने माहेरवाशीणींसाठी मुद्दामहून ठेवलेल्या स्पर्धेने सर्वजणी भारावून गेल्या होत्या.
ग्रुप ग्रामपंचायत केर – भेकुर्ली ने तीन दिवसीय श्रावणधारा महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये महिला सन्मानासाठी एक दिवस राखीव ठेवण्यात आला होता. यामध्ये माहेरवाशीण महिलांची गावाची ओढ आणि आपुलकीची भावना अधिक वृद्धिंगत व्हावी आणि गाव विकासात त्यांची भूमिका महत्वाची राहावी यासाठी “माझ्या माहेरची साडी” ही स्पर्धा घेण्यात आली. त्यात रसिका श्रीकृष्ण गवस (प्रथम), निधी नितेश देवळे (द्वितीय), प्रिया बालकनाथ रेडकर (तृतीय) स्नेहल सचिन मातोंडकर, रश्मी रामदास देसाई (उत्तेजनार्थ) यांना माहेरची साडी देऊन गौरविण्यात आले.
गावातील महिलांसाठी दुसऱ्या गटात स्पर्धा घेण्यात आली यामध्ये संचीता दाजी देसाई (प्रथम)
नमिता अभिजित देसाई (द्वितीय), मेघना महादेव देसाई (तृतीय) उत्तेजनार्थ तनिषा तुषार देसाई आणि उर्वी उदय देसाई यांनाही साडी देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे साठ वर्षांवरील महिलांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत सुभद्रा सुखाजी देसाई (प्रथम),वसुधा आबा खानोलकर (द्वितीय) यांचाही साडी देऊन सन्मान करण्यात आला.स्पर्धेसाठीच्या साड्या (कै.) शैला भास्कर देसाई यांच्या स्मरणार्थ मनीषा बर्डे यांनी यांनी पुरस्कृत केल्या होत्या. स्पर्धेचे निवेदन आणि पंच म्हणून बांद्यातील प्राथमिक शिक्षक जे. डी. पाटील, स्वाती पाटील व अमित पाटील यांनी काम पाहिले.
माहेरचा सन्मान लक्षात राहणारा
"माझ्या माहेरची साडी" स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या रसिका गवस म्हणाल्या, खरं तर माहेरच्या ठिकाणी कार्यक्रम होतोय त्याचेच कुतूहल होते.स्पर्धक भगिनी अनेक होत्या. त्यातून आपला क्रमांक येणे अविस्मरणीय क्षण आहे.
