बांद्यात खेमराज हायस्कूल समोरून धावणाऱ्या डंपरवर बंदी घाला

रियाज खान यांची पोलिस निरीक्षकांकडे लेखी मागणी

⚡बांदा ता.११-: बांदा शहरातील खेमराज कॉलेज रस्त्यावर भरधाव धावणाऱ्या डंपरमुळे अपघाताची शक्यता असून या अरुंद रस्त्यावर शाळा कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर डंपर वाहतुकीवर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शिवसेना अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बांदा पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.


निवेदनात म्हटले आहे की, गोव्यातील तपासणी नाके चुकविण्यासाठी परप्रांतीय डंपर चालक शहरातील खेमराज हायस्कुलच्या रस्त्यावर बेदरकारपणे डंपर चालवीतात. या रस्त्यावर खेमराज शाळा तसेच कॉलेज आहे. येथून शेकडो विद्यार्थी ये जा करत असतात. याच रस्त्यावर बांदा ग्रामपंचायत कार्यालय असून शहरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने शासकीय कामकाज करण्यासाठी ये जा करतात.
हा रस्ता अरुंद असून दोन दिवसांपूर्वी याठिकाणी शाळकरी मुलाला डंपरने हूल दिल्याने मुलगा गटारात पडला होता. डंपर चालकांना वेळोवेळी सूचना देऊनही या रस्त्यावरून भरधावं वेगात डंपर हाकण्यात येत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शाळेच्या वेळेत वाहतूक पोलीस नेमावा किंवा या रस्त्यावरील डंपर वाहतूक बंद करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रभारी पोलीस निरीक्षक श्री ठाकूर यांनी दिले.
यावेळी पुंडलीक बांदेकर, नंदकीशोर बांदेकर, मोहसिन खान, सागर धोत्रे, श्रीकांत धोत्रे, मुन्ना शेख, नवाज शेख, आपा कोचरेकर, तुषार मांजरेकर, ओंकार नाडकर्णी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page