सहाय्यक पोलीस निरीक्षक कोल्हटकर यांचे आवाहन
ओरोस ता.१०-:
मंदिर परिसरात सीसीटिव्ही बसवा. पहारेकरी नेमा. फंड पेटी वेळोवेळी फोडून त्यातील रक्कम काढून घ्या, असे आवाहन सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील मंदिर मानकरी, ट्रस्टी यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनीष कोल्हटकर यांनी केले आहे.
ओरोस सावंतवाडा येथील भवानी मंदिराची फंड पेटी अज्ञात चोरट्याने फोडली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी अधिक सतर्क होत, याची पुनरावृत्ती होवू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यातीलच एक भाग म्हणून ओरोस, रानबांबुळी, कसाल, कुंडे, हुमरमळा, अणाव, पणदूर, या कार्यक्षेत्रातील गावांतील मंदिरांचे मानकरी, ट्रस्टी यांची ओरोस रवळनाथ मंदिर येथे बैठक घेतली. या बैठकीला मंदिरांचे मानकरी, ट्रस्टी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना कोल्हटकर यांनी, मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे. यासाठी सीसीटिव्ही बसविणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच पहारेकरी नेमणे. मंदिरातील रक्कम वेळोवेळी काढून घेणे आणि क्यू आर कोडचा वापर करणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दौर, उपनिरीक्षक राजेंद्र दळवी, पोलीस कर्मचारी प्रथमेश ओरसकर यांच्यासह अन्य पोलीस उपस्थित होते.
