संदीप पांडवर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ओरोस ता ७-:
देवगड पवनचक्कीच्या दहा मीटर अंतरावर बसविण्यात आलेल्या झीप लाईनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी वापरण्यात आलेल्या तारेची कोणतीही टेस्टिंग करण्यात आलेली नाही. साध्या प्रकारची, कमी दर्जाची, कमी जाडीची, लवकर गंजणारी तार आहे. त्यामुळे या तारेवरून सोडण्यात येणाऱ्या व्यक्तींच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे ही झीप लाईन ताबडतोप बंद करण्यात यावी. अन्यथा भविष्यात दुर्घटना घडल्यास याला प्रशासन जबाबदार राहील, अशाप्रकारची तक्रार येथील संदीप भगवान पांडवर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत देण्यात आलेल्या निवेदनात पवनचक्की वरील गार्डनला कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नसताना नगरपंचायत मधील नगराध्यक्ष, सर्व सदस्य प्रतीबाधित क्षेत्र असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पवनचक्की परिसरात १० मीटर अंतरावर झीप लाईनची सुविधा करण्यात आली आहे. तरीही येथील लोकसेवक, सरकारी यंत्रणा पाठीशी घालत आहेत. पैशाच्या जोरावर झीप लाईनला परवानगी मिळविण्यात आली आहे. पर्यटन विकासाच्या नावाखाली झीप लाईनचे धोकादायक प्रयोग सुरू आहेत. कमी दर्जाची तार झीप लाईनला वापरल्यामुळे एका वर्षात तारेची लांबी वाढली आहे.
येथील परिसरात दुकाने, गाड्या, मनुष्य गर्दी होत असते. त्यामुळे या निकृष्ट झीप लाईनच्या तारेची पाहणी करून ही सुविधा तात्काळ बंद करावी. याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितली असता नगर पंचायतीने आपल्याकडे कोणताही परवाना घेतल्याचे पुरावे नसल्याचे कळविले आहे, असे संदीप पांडवर यांनी म्हटले आहे.
