यंगस्टार मित्रमंडळ कणकवली आयोजित भालचंद्र चषक स्पर्धा:पंचक्रोशी फोंडा संघाला पराभूत करीत मिळविला विजय..
मालवण दि प्रतिनिधी
यंग स्टार मित्रमंडळ कणकवलीच्या वतीने निमंत्रित संघाच्या भालचंद्र चषक कणकवली स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंचक्रोशी फोंडा संघाला पराभूत करत महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकावले. पंचक्रोशी फोंडा संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. महापुरुष रेवतळे मालवण संघाचा खेळाडू संकेत जाधव याला स्पर्धेतील अष्टपैलू खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना महापुरुष रेवतळे मालवण विरुद्ध यंगस्टार कणकवली – ब यांच्यात झाला. यामध्ये महापुरुष रेवतळे संघाने १७ विरुद्ध ६ अशा एकतर्फी गुणांनी कणकवली – ब संघावर विजय मिळवला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात पंचक्रोशी फोंडा संघाने २४ विरुद्ध १४ फरकाने कणकवली – अ संघावर विजय मिळविला. रेवतळे महापुरुष विरुद्ध पंचक्रोशी फोंडा यांच्यात रंगलेल्या अंतिम सामन्यात महापुरुष रेवतळे संघाने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपले वर्चस्व कायम ठेवत एकतर्फी विजेते पदावर आपले नाव कोरले. यामध्ये ललित चव्हाण, किर्तेश परब, कुंदन हुर्णेकर यांनी भरीव अशी कामगिरी केली व त्यांना मंदार आंबेरकर, प्रथमेश आढाव, यांची साथ लाभली.
विजेत्या महापुरुष रेवतळे संघास रुपये दहा हजार व चषक तर उपविजेत्या पंचक्रोशी फोंडा संघास रुपये सात हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपांत्य सामन्यात पराभूत संघ कणकवली – ब व कणकवली – अ यांनाही पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेत उत्कृष्ट पकड – ललित चव्हाण (महापुरुष मालवण), उत्कृष्ट चढाई – अमित चव्हाण (पंचक्रोशी फोंडा) यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
