दुरुस्तीला 24 तास व्हायच्या आत बांबर्डेतील खड्डयात डंपरचा अपघात

⚡दोडामार्ग,ता.०६-: मुळस ते वीजघर दरम्यान बांबर्डे येथे रस्त्यात पडलेले भगदाड शनिवारी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवले खरे;मात्र ते काम तकलादू निघाल्याने त्याच खड्डयात आज रविवारी सकाळीच डंपरची चाके फसली आणि बांधकाम विभागाने दाखवलेली तत्परता बिनकामाची ठरली.

दोडामार्ग – मुळस – वीजघर मार्गावर बांबर्डे येथे घातलेल्या छोट्या मोरीचा पाईप तुटून भगदाड पडले होते.शिवाय रस्त्याला आडवा चर पडला होता.त्यामुळे स्थानिकांनी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी वाहनचालकांना सूचना म्हणून त्या भगदाडात झाडाच्या फ़ांद्या उभ्या केल्या होत्या.तर सरपंच साक्षी देसाई यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाचे लक्ष वेधून रस्ता निर्धोक करण्याची मागणी केली होती.त्यानंतर रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता संभाजी घंटे ,दत्ताराम देसाई आदींनी भगदाड व चर बुजवला;मात्र सकाळ होताच ते काम निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले.खड्डा बुजवून काही तास उलटायच्या आतच त्याच खड्डयात एका डंपरची मागील चाके जाऊन डंपर अपघातग्रस्त झाला.डंपरची दोन्ही पुढची चाके वर उचलली होती. अपघातग्रस्त डंपर बाजूला करून तो खड्डा आणि चर पुन्हा बुजविण्यात आला.पावसाळ्यानंतर त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात येणार आहे.

You cannot copy content of this page