⚡वेंगुर्ला ता.२६-: आज सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत, प्रत्येक मुलाला घडविण्यामध्ये गुरुजनांसोबत आई-आजी यांचा बहुमोल वाटा असतो. आपल्या पाल्याला सुसंस्कृत करण्यासाठी शाळेत दाखल केल्यानंतर महिला शाळा व्यवस्थापन समिती आणि माता-पालक समितीवर सदस्य किवा पदाधिकारी म्हणून वेळ व सेवा देत असतात. अशा सर्व समिती सदस्य महिलांसाठी वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्यावतीने आणि कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर मेस्त्री सांस्कृतिक मंच, दाभोली यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले आहे.
शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करत असताना या महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावे, पुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक, माध्यमिक अनुदानित – विनाअनुदानित सर्व शाळांमधील शाळा व्यवस्थापन व माता-पालक समिती महिला सदस्यांसाठी सदर स्पर्धा खुली आहे. निबंध लेखनासाठी ‘मोबाईलचे दुष्परिणाम-आई-बाबांसोबत तुटलेला संवाद‘ हा विषय असून किमान ७०० तर कमाल १००० शब्दांमध्ये महिलांनी आपले मत मराठी भाषेत व्यक्त करायचे
आहे. सोबत समिती सदस्य असल्याबाबत शाळेचे शिफारस पत्र जोडणे अनिवार्य आहे. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना १०००, ७००, ५०० तर उत्तेजनार्थ २५०ची दोन तसेच चित्रफ्रेम, प्रमाणपत्र आणि मेडल आणि सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
निबंध हा कागदाच्या एका बाजूला स्वःहस्ताक्षरात लिहून पोस्टाने किंवा हाती वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस; द्वारा प्रा.सचिन वासुदेव परुळकर, मु.पो.तुळस, ता.वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग, पिन-४१६५१५ या पत्त्यावर दि.२५ ऑगस्ट २०२३ पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा.सचिन परुळकर (९४२१२३८०५३) यांच्याशी संफ साधावा असे आवाहन आंतरराष्ट्रीय पंच व क्रीडा संस्कृती प्रचारक अशोक दाभोलकर-मेस्त्री आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांनी केले आहे.
