⚡दोडामार्ग,ता.२४-: तालुक्यात सोमवारी सहाव्या दिवशीही जोरदार पाऊस पडत आहे.सोसाट्याच्या वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे रस्त्यात ठिकठिकाणी झाडे पडून वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.शिवाय अनेक गावातील वीज अनेक दिवसांपासून गायब आहे.
साटेली भेडशी परिसरात सुद्धा विजेचा लपंडाव सुरू आहे.त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
मुसळधार पावसामुळे रविवारी मणेरी – वानोशी – साटेली भेडशी या मार्गावरील वानोशी येथील कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. साटेली ते परामे घोटगे मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने परमे व घोटगे येथील ग्रामस्थांना साटेली भोमवाडी व घोटगेवाडी येथून तिलारी कालव्यावरून प्रवास करावा लागत होता. कोनाळ ते घोटगेवाडी दरम्यानचा कमी उंचीचा पूल पाण्याखाली गेल्याने घोटगेवाडी, केर,मोर्ले येथील ग्रामस्थांना घोटगेवाडीतील नव्या पुलाचा उपयोग झाला; मात्र केर गावाच्या अलीकडील छोट्या पुलावर पाणी असल्याने ग्रामस्थांची काही काळ गैरसोय झाली.दरम्यान,सार्वजानिक बांधकाम विभागाने मांगेली येथे डोंगर खचून रस्त्यात पडलेली दगड, माती जेसीबीने हटवून रस्ता पूर्ववत केला.