राजन पोकळे यांनी गांभीर्याने पहावे:
भाजपच्या बंटी पुरोहित यांचा इशारा
सावंतवाडी,ता.१९: शहरातील आठवडा बाजार भरत असलेल्या परिसरातील रेन ट्री धोकादायक होत आहे. त्यामुळे त्या झाडांची भिती नाही असे सांगणार्या राजन पोकळेंनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावा, अन्यथा एखादा अपघात घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल भाजपा युवा मोर्च्याचे जिल्हा चिटनीस बंटी पुरोहित यांनी केला आहे. दरम्यान त्या ठिकाणची झाडे तोडणे जमत नसेल तर पोकळेंनी मंत्र्यांना सांगून आठवडा बाजार पुन्हा मोती तलावाच्या काठी भरवावा, त्याठिकाणी कोणताही धोका नाही, आपल्या हट्टासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करू नये, असे पुरोहित यांनी सांगितले. याबाबत श्री. पुरोहित यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे.
यात असे म्हटले आहे की, सावंतवाडीचा आठवडा बाजार भरत असलेल्या ठिकाणी असलेली झाडे धोकादायक आहे. त्या ठिकाणी बाजारा दिवशी एखादी फांदी कोसळल्यास मोठा अपघात होवू शकतो. त्यामुळे त्या फांद्याबाबत योग्य तो निर्णय पालिका प्रशासनाने घेणे गरजेचे होते. मात्र त्यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी ती रेन ट्री ची झाडे आहेत, धोकादायक नाहीत, असा निर्वाळा दिला होता. तुर्तास फांद्या तुटून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य तो निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा मोती तलावाच्या काठावर आठवडा बाजार न्या, अशी पुरोहित यांनी मागणी केली आहे.
