⚡ओरोस ता.२२-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शून्य शिक्षकी शाळांकामकाज नियोजनबाबत प्रशासनास शिक्षक समितीचे पूर्ण सहकार्य राहील असे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नारायण नाईक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये स्पष्ट केले आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्तपदे शासनाकडून शिक्षक भरतीने भरेपर्यंत प्रशासनस्तरावरील सुरू असलेल्या शाळांच्या व्यवस्थापन नियोजनबाबत शिक्षक समितीच्या सर्व तालुकाशाखा शिक्षण विभाग प्रशासनास पूर्णतः सहकार्य करणार हि शिक्षक समितीची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.
आंतरजिल्हा बदली ,सेवानिवृत्ती यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि प शाळांमध्ये शिक्षकांची रिक्तपदे मोठ्याप्रमाणात निर्माण झाल्याने जिल्ह्यातील 128 शाळा शून्य शिक्षकी झाल्याने या शाळांचे व्यवस्थापनचा प्रश्न निर्माण झाला.या शाळांवर शिक्षक तात्काळ मिळण्यासाठी लोकप्रतिनिधींकडूनही जोरदार आवाज उठवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर 15 जूनपासून शाळा सुरू झाल्यानंतर 128 जि प शाळावर शिक्षण विभागाकडून तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक देणेबाबतच्या नियोजनास प्राथमिक शिक्षक समितीच्या सर्व तालुका शाखांनी गटशिक्षण कार्यालयास पूर्णतः सहकार्य केलेले आहे. जिल्ह्यातील रिक्तपदांवर शासनाने तात्काळ शिक्षक भरती प्रक्रीया राबवून रिक्त पदे भरावीत ही प्राथमिक शिक्षक समितीची आग्रही मागणी आहे.
