काळी फीत लावून व्यक्त केला निषेध : वस्तू आणि सेवा कर कार्यालयाबाहेर दाखवले काळे झेंडे
*💫मालवण दि.२६-:* केंद्र सरकराने लागू केलेल्या जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीच्या विरोधात’ कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, नवी दिल्ली (कॅट) अखिल भारतीय कंजूमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूटर फेडरेशन यांनी पुकारलेल्या ‘भारत व्यापार बंद’ व ‘देशव्यापी चक्काजाम’ आंदोलनाला जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा देत महासंघाच्या आवाहनानुसार शुक्रवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी काळी फीत लावून आपला निषेध व्यक्त केला. तसेच वस्तू आणि सेवा कर कार्यालयाबाहेर काळे झेंडे दाखवून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविला. दरम्यान, या आंदोलनांतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन सिंधुदुर्ग या संलग्न संघटनांनी जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व केंद्रीय जीएसटी विभाग सहाय्य आयुक्त, प्रताप हरी अजगेकर यांना निवेदन सादर केले. जीएसटी मधील जाचक अटी, तरतुदी व किचकट संगणक प्रणालीबाबत केंद्रशासनाकडून योग्य तो सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा, अशी मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली. गेल्या ३ ते ४ वर्षात जीएसटी कर प्रणालीतील तरतुदी अधिकाधिक जाचक झाल्या आहेत. वारंवार नियम बदलण्यात येत असल्याने करप्रणाली किचकट झाली आहे. विलंब शुल्क अनावश्यक लावले जात आहे. परताव्यात चूक झाल्यास दुरुस्त करता येत नाही. जीएसटी पोर्टल व्यवस्थित चालत नाही. भारतातील सर्व छोटे-मोठे व्यापारी, उद्योजक यांना कर कायद्यांची पूर्तता करायची असते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक असते. छोट्या आणि मध्यम व्यापाऱ्यांना ही कामे स्वत:च करावी लागतात. कर विभागाला कर चुकविणाऱ्यांना जेरबंद करता येत नाही, म्हणून दरवर्षी किचकट तरतुदी आणि पूर्तता करण्याचे ओझे शासनाने प्रामाणिक करदात्यांवर लादले आहे. त्यात लहान, मध्यम, प्रामाणिक व्यापारी भरडले जात आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ अध्यक्ष नितीन तायशेटे, जिल्हा व्यापारी पतसंस्था अध्यक्ष नितीन वाळके, सिंधुदुर्ग जिल्हा कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशन अध्यक्ष अरविंद नेवाळकर, जिल्हा कार्यवाह व जीएसटी जिल्हा प्रतिनिधी विवेक नेवाळकर आदी उपस्थित होते.