“शासन आपल्या दारी” उपक्रमासाठी कुडाळ सज्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्य उपस्थिती

⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या, मंगळवार दि. ६ मे २०२३ रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर “शासन आपल्या दारी” उपक्रमासाठी उपस्थित राहतील. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नियोजनासाठी जोरदार कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सोमवारी संध्याकाळी नियोजनाचा संपूर्ण आढावा घेतला. या कार्यक्रमासाठी जवळपास १३ हजार नागरीकांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे.
“शासन आपल्या दारी”या उपक्रमांतर्गत कोणत्याही लाभार्थ्याची गैरसोय होता कामा नये, गावातून नियोजित स्थळी लाभार्थ्यांना पोहोचवण्यासाठी ३०० एसटी बसेसची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर, रायगड जिल्ह्यातून एसटी बसेसची अतिरिक्त कुमक तसेच बसचालक सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. वेंगुर्ले, दोडामार्ग, वैभववाडी, देवगड या लांब असलेल्या तालुक्यात या बसेस पाठविण्यात येणार आहेत.
तसेच आरोग्याची कोणती तक्रार उद्भवू नये, पार्किंग आणि वाहतूकीची कोणतीही गैरसोय होऊ नये, पावसाळा जवळ आला असल्यामुळे पाऊस आला तर काय ? याबाबत योग्य नियोजन जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होते. दरम्यानच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा कुडाळकर, रणजित देसाई, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, श्रीपाद तवटे, रुपेश कानडे आदि उपस्थित होते.

पालकमंत्र्यांकडून आढावा..!
सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रविवारी कुडाळ हायस्कूल येथील मैदानावर कार्यक्रमाच्या नियोजनाचा परिपूर्ण आढावा घेतला होता. आजही संध्याकाळी ७ वाजता उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यक्रमस्थळी धावती भेट घेतली.

वाहतूक नियोजन
उद्या कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री ना. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत “शासन आपल्या दारी” हा शासकीय कार्यक्रम होत आहे. त्यासाठी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून खालील प्रमाणे वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ४ वा.पर्यत हॉटेल अभिमन्यू तिठा – बालोद्यान -एस. एन. देसाई चौक हा रस्ता सर्व वाहनासाठी प्रवेश बंद, हॉटेल अभिमन्यू तिठा – सीटी सेंटर तिठा -एस. एन. देसाई चौक हा रस्ता मुख्यमंत्री शिंदे यांच्या आगमन व निर्गमनच्या मुदतीत काही काळ बंद ठेवण्यात येईल. याची नोंद घ्यावी व शक्यतो पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन केले आहे.
पार्किंग व्यवस्था
कुडाळ तालुका क्रीडासंकुल मैदान व काळप नाका बस डेपो येथे एसटी पार्किंग, गवळदेव मंदिर शेजारी व तालुका क्रीडासंकुल मैदानाशेजारी चारचाकी खाजगी पार्किंग, तहसीलदार कार्यालय परिसर येथे सरकारी वाहन पार्किंग, एसीबी कार्यालय रस्ता येथे दुचाकी व चारचाकी खाजगी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page